हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने मंचावर लावलेले वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे फलक हटवले
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील ईदगाह मैदानात श्री गणेशचतुर्थी उत्सवाच्या वेळी मंचावर लावलेले वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे फलक अधिकार्यांनी हटवले. ईदगाह मैदानात ‘गजानन उत्सव महामंडळा’ने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र श्री गणेशमूर्तीच्या शेजारी लावले होते आणि त्यांच्या चित्रांसह फलकही लावले होते, तसेच कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वीर सावरकरांचे चित्र असलेले फलक टांगले होते. कार्यक्रमासाठी ठरवून दिलेल्या निकषांचे उल्लंघन केल्याने हे फलक काढण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
ईदगाह मैदानात श्री गणेश सोहळ्यात महाआरतीला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, वीर सावरकर हे महान देशभक्त आहेत, असे आयोजकांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे छायाचित्र लावले आहे. त्यात चुकीचे काय आहे ?
याआधी कर्नाटक उच्च न्यायालयाने हुब्बळ्ळी येथील ईदगाह मैदानावर श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याची अनुमती दिली होती. अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली याचिका फेटाळून लावतांना न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, ही जमीन हुब्बळ्ळी-धारवाड महानगरपालिका आयोगाची मालमत्ता आहे आणि ते ज्याला पाहिजे त्याला भूमी देऊ शकतात. या मैदानात प्रथमच हिंदु उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.