संभाजीनगर येथील ९० टक्के शिक्षक गावात न रहाता खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात ! – आमदार प्रशांत बंब यांचा आरोप
संभाजीनगर, ३ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यातील जवळपास ७० टक्के शिक्षक गावात रहात नाहीत. ते खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी २ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. विशेषतः ‘शिक्षक मतदारसंघ रहित करा’, अशी मागणी त्यांनी नुकतीच केली आहे.
आमदार बंब पुढे म्हणाले की, शिक्षक आमदारांचे म्हणणे आहे की, केवळ ५ टक्के शिक्षक येऊन-जाऊन करतात; मात्र राज्यातील जवळपास ९० टक्के शिक्षक आपल्या मुख्यालयी रहात नाहीत. हे शिक्षक धादांत खोटे बोलतात. चुकीची कागदपत्रे सादर करून घरभाडे घेत आहेत. आता ५ सप्टेंबर या दिवशी सरपंच आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांनी गावात रहाणार्या शिक्षकांच्या घरी जाऊन पूजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षकांसाठी सरकारने प्रचंड व्यवस्था केली आहे. माझे शिक्षणही जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. पूर्वीच्या काळातील शिक्षकांना अधिक कामे होती. संगणकामुळे शिक्षकांची कामे अल्प आणि सोपी झाली आहेत. पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अधिक दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्रचंड व्यवस्था आहे. शिक्षक गुणवत्तापूर्वक शिक्षण देत नाहीत. यासाठीच ते स्वतःच्या मुलांना खासगी शाळेत घालतात. शिक्षकांच्या आणि शिक्षकांना पाठिंबा देणार्या लोकांमुळे आपले राज्य डबघाईला आले आहे, असा आरोप बंब यांनी केला.