दायित्व घेऊन सेवा करतांना स्वतःतील अहंचे निरीक्षण करण्यासंदर्भात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !
‘मला दैवी बालसाधकांचा ‘बालसत्संग’ घेण्याची अमूल्य सेवा मिळाली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला. देवाच्या कृपेने मी प्रतिदिन दैवी बालसाधकांचा सत्संग घेण्यास आरंभ केला. त्यानंतर माझ्या मनात ‘मला दैवी बालसाधकांचा सत्संग घेण्याचे दायित्व दिले आहे. मला सतत काही बालसाधकांना शिकवण्यास सांगितले जाते आणि त्यांना साधनेच्या दृष्टीने साहाय्य करण्यास सांगितले जाते. ‘या सर्व गोष्टींमुळे माझा अहं वाढून माझी साधनेत घसरण होणार नाही ना ?’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्या संदर्भात मी परात्पर गुरुदेवांना अनेक वेळा प्रार्थना केल्या. मी सतत शरणागत भावात रहाण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या विचारांमुळे मला भीती वाटून माझे हातपाय गळून जायचे.
एकदा मी या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सांगितले. त्या वेळी त्यांच्या माध्यमातून मला अनेक अनमोल सूत्रे शिकायला मिळाली. ‘हे गुरुदेवा, तुमच्या अनंत कृपेमुळे मधुराताईंच्या माध्यमातून तुम्ही मला जी सूत्रे शिकवली, ती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
(भाग १)
१. दायित्व घेऊन सेवा करतांना ‘स्वतःचा अहं वाढेल का ?’, असा विचार मनात येत असल्यास ठेवायचे दृष्टीकोन
अ. ‘मी इतरांपेक्षा वेगळी आहे किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे’, असा विचार मनात येत असेल, तर स्वतःतील अहं वाढत आहे’, हे लक्षात घ्यावे. सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने अहं वाढत नाही.
आ. अन्य साधकांनी आपल्याला काही सुचवले, तर ते स्वीकारावे.
इ. स्वतःच्या आध्यात्मिक पातळीचा विचार कधी करू नये.
ई. कुणी आपले कौतुक केल्यास कौतुक देवाच्या चरणी अर्पण करावे.
उ. आपल्या मनात अहंचे विचार आले, तर आपण अपराधीभावाने क्षमायाचना करावी आणि आपल्या मनात अहंचे विचार नसतील, तर आपण शरणागतभावाने देवाला प्रार्थना करावी.
ऊ. ‘देवाचे माझ्याकडे लक्ष आहे. त्यामुळे तो माझा अहं वाढूच देणार नाही’, अशी दृढ श्रद्धा ठेवावी.
२. अहं न्यून होण्यासाठी करायचे प्रयत्न
अ. ज्याच्यामध्ये अहं नाही, तोच इतरांमधील अहं नष्ट करू शकतो. त्यामुळे अशा परम श्रेष्ठ भगवंतालाच शरण जायला हवे आणि ‘हे देवा, तुझ्याविना माझे कुणीच नाही’, अशी त्याला सतत प्रार्थना करावी.
आ. इतरांनी आपल्याला चूक सांगितल्यावर आपण ती त्वरित स्वीकारली, तर आपला अहं न्यून होतो. याउलट जर आपण ‘स्पष्टीकरण दिले, तर आपला अहं वाढला आहे किंवा तो कार्यरत झाला आहे’, असे आपण समजावे.
इ. आपण कुणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेवू नये. आपण चिंतन करून आपले मत समष्टीमध्ये मांडायला हवे. त्यानंतर समष्टीने आपल्याला काही सुचवले, तर तेही ऐकून घ्यावे.
ई. आपल्या मनात एखाद्या सेवेविषयी संभ्रम असेल, तर आपण आपल्या स्तरावर विचार किंवा कृती न करता उत्तरदायी साधकाला विचारून घ्यावे. विचारून घेण्याच्या वृत्तीमुळे आपल्यातील अहं न्यून होतो.
३. सतत भावस्थितीत राहिल्याने सुप्त अहंशी लढता येणे शक्य होणे
ज्या वेळी आपला भाव जागृत असतो, त्या वेळी आपल्यातील अहं सुप्त असतो. आपली भावस्थिती नसते, त्या वेळी आपल्यातील अहं कार्यरत असतो. आपल्यातील अहं न्यून करण्यासाठी आपल्याला सतत भावस्थितीत रहाणे आवश्यक असते.
४. भावस्थितीत कसे रहावे ?
‘भावस्थिती म्हणजे देवच सर्व करवून घेतो’, याची सतत जाणीव असणे. ‘आपण शरिराने कुठलीही कृती केली, तरी आपले ईश्वराशी अनुसंधान असणे’, म्हणजे भावस्थितीत राहून सेवा करणे.
५. ‘सात्त्विक अहं’ हा सूक्ष्म अहं असतो. आपल्याला तोही नको.
मधुराताईने हे सूत्र सांगितल्यावर मला माझ्यातील सात्त्विक आणि सूक्ष्म अहंची जाणीव झाली. त्यानंतर मी माझ्यातील गुण वाढवण्यासाठी प्रत्येक बालसाधकाचे निरीक्षण करणे चालू केले. त्यामुळे माझ्यातील सूक्ष्म अहं न्यून होण्यास साहाय्य होऊ लागले आणि मी सतत शिकण्याच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न करू लागले.’
(क्रमशः वाचा पुढील रविवारी)
– कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.१०.२०२१)