सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्या वस्त्रांचा पुरस्कार करा ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाचा निष्कर्ष
श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे ९६ वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत १७ राष्ट्रीय आणि ७८ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ११ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार’ मिळाले आहेत. |
मुंबई – रंग, नक्षी (डिझाईन), कापडाचा पोत आणि वस्त्राचा आकार किंवा प्रकार यांची स्वतःची विशिष्ट सूक्ष्म स्पंदने असतात आणि म्हणूनच ती आपल्यावर आध्यात्मिक स्तरावर परिणाम करतात. वस्त्रांचा आपल्या देहाशी दिवसभर संपर्क होत असल्याने त्यांचा आपल्यावर शारीरिक आणि मानसिक स्तरांवर आध्यात्मिकदृष्ट्या अधिक परिणाम होतो, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या आध्यात्मिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या व्यतिरिक्त वस्त्राच्या उत्पादनाची प्रक्रिया, ते बनवण्याच्या ठिकाणाचे वातावरण, शिंपी आणि ज्या दुकानातून ते खरेदी केले असेल, हे घटकही वस्त्रातील स्पंदनांवर परिणाम करतात. त्यामुळे आपण सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्या वस्त्रांचा पुरस्कार करायला हवा, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ‘द फिप्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अपॅरल टेक्सटाईल्स अँड फॅशन डिझाइन’, या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘ग्लोबल अकॅडमिक रिसर्च, श्रीलंका’ यांनी ‘ऑनलाईन’द्वारे केले होते. श्री. क्लार्क यांनी या परिषदेत ‘रंग, डिझाईन, वस्त्र आणि फॅशन यांचा सूक्ष्म स्पंदनांवर कसा परिणाम होतो ?’, हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
श्री. क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने वस्त्रांच्या विविध पैलूंच्या संदर्भात केलेले संशोधन मांडतांना आरंभी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या प्रभावळ मोजणार्या उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या प्रयोगाची माहिती दिली. ते म्हणाले की,
१. पांढर्या आणि काळ्या रंगांच्या धुतलेल्या सूती कापडाची ‘यू.ए.एस्.’द्वारे चाचणी केली. काळ्या रंगाच्या कापडामध्ये सकारात्मकता अजिबात आढळली नाही, तर त्यातील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १७.८७ मीटर एवढ्या प्रमाणात होती. याउलट पांढर्या रंगाच्या कापडात नकारात्मकता अजिबात आढळली नाही, तर त्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १८.७५ मीटर एवढी होती.
२. या चाचणीत एका व्यक्तीने काळे आणि त्यानंतर पांढरे कपडे घातल्यानंतर त्या व्यक्तीमधील सकारात्मकता अन् नकारात्मकता यांचीही ‘यू.ए.एस्.’द्वारे मोजणी करण्यात आली. त्यात काळे कपडे परिधान केल्यावर केवळ ३० मिनिटांमध्ये व्यक्तीमधील नकारात्मकता ९९ टक्क्यांनी वाढली. ‘सर्व रंगांमध्ये काळा रंग सर्वाधिक नकारात्मकता प्रक्षेपित करतो’, असे या संशोधनात आढळले. अर्थात् हा नियम केवळ निर्जीव वस्तूंपुरता मर्यादित आहे, सजिवांसाठी नाही. उदा. त्वचेचा रंग गोरा आहे कि काळा ? याचा त्या व्यक्तीच्या प्रभावळीवर काहीही परिणाम होत नाही.
३. कापडावरील डिझाईनचा त्यावर होणार्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एकाच प्रकारच्या ४ कापडांच्या तुकड्यांची ‘यू.ए.एस्.’ने मोजणी करण्यात आली. यामध्ये फिकट निळ्या रंगाच्या कापडावर पांढर्या फुलांची नक्षी असलेले पहिले कापड; पांढर्या कापडावर रंगीत फुलांची नक्षी असलेले दुसरे कापड; लालसर गुलाबी रंगाच्या कापडावर फुलांची क्लिष्ट नक्षी असलेले तिसरे कापड आणि पांढर्या रंगाच्या कापडावर कवट्यांची नक्षी असलेले चौथे कापड घेण्यात आले.
४. या संशोधनात पहिले कापड सर्वांत सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारे अर्थात् सात्त्विक असल्याचे लक्षात आले. त्यामध्ये अजिबात नकारात्मकता नसून त्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १७ मीटर एवढी मोठी होती. दुसर्या कापडातील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १२ मीटर, तर सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १.२५ मीटर होती. तिसर्या कापडात २२ मीटरपर्यंत नकारात्मकता आढळली आणि सकारात्मकता अजिबात नव्हती. कवट्यांचे डिझाईन असलेल्या कापडात सर्वाधिक नकारात्मकता १८४ मीटर एवढी होती !
५. ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेअरन्स फोटोग्राफी (पिप)’ ही प्रणाली वापरून केलेल्या चाचणीतही कवट्यांचे डिझाईन असलेले कापड खोलीतील वातावरणात नकारात्मकता वाढवत असल्याचे आढळले.
६. विविध प्रकारच्या कापडांची ‘विकत घेतल्यानंतर’, ‘धुतल्यानंतर’ आणि ‘इस्त्री केल्यानंतर’, अशा ३ टप्प्यांत ‘यू.ए.एस्.’द्वारे चाचण्या घेण्यात आल्या. यात कापड धुण्यापूर्वी वातावरणातील नकारात्मकतेमुळे कापड अधिक नकारात्मक असल्याचे आढळले. ते धुतल्यानंतर त्या कापडातील मूळ स्पंदने लक्षात आली. इस्त्री केल्यानंतर मुळात नकारात्मक असलेली कापडे अधिक नकारात्मक झाल्याचे, तर सकारात्मक असलेली कापडे अधिक सकारात्मक झाल्याचे आढळले.
७. यामध्ये रेशमी आणि सूती कापड यांतून अधिक सकारात्मक स्पंदने आढळली, तर ‘पॉलिएस्टर’, ‘नायलॉन’, ‘जॉर्जेट’ आणि ‘लिक्रा’ या कापडांतून अधिक नकारात्मक स्पंदने आढळली. कापड कापून शिवल्यावर ते अधिक नकारात्मक बनत असल्याचेही या संशोधनातून लक्षात आले.
८. त्यामुळे साडीचे कापड एक सलग असल्याने, तसेच ती ज्या पद्धतीने नेसली जाते, त्यामुळे तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात प्रवाहित होतात, असेही लक्षात आले.
संशोधनाचा सारांश सांगतांना श्री. क्लार्क म्हणाले की, जेव्हा एखाद्याला सूक्ष्म स्पंदने कळू लागतात, तेव्हा कशातून सकारात्मक स्पंदने आणि कशातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहे, हे ती व्यक्ती सहज जाणू शकते. कापडांचे डिझाईन बनवणार्या व्यक्तींमध्ये सूक्ष्म स्पंदने कळण्याची क्षमता असेल, तर त्याचा समाजाला लाभ होईल, तसेच कापड खरेदी करणार्या व्यक्तींमध्ये सूक्ष्म स्पंदने कळण्याची क्षमता असेल, तर तेही सात्त्विक कापडांची खरेदी करू शकतील.