मिरामार आणि बोगमाळो येथे विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती तरंगत समुद्रकिनार्यावर !
गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीं पूजण्यात आल्याचे उघड
पणजी, ३ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यशासनाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशचतुर्थीच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्रीवर बंदी घातलेली होती, तरीही अशा मूर्तींची राज्यात विक्री झाल्याचे किंवा अशा मूर्ती पूजण्यात आल्याचे उघड झाले आहे. दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर मिरामार आणि बोगमाळो समुद्रकिनार्यावर विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती समुद्रकिनारी पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले आहे. बोगमाळो समुद्रकिनार्यावर विसर्जन केलेल्या एकूण १६ मूर्ती किनार्याच्या कडेला आल्या. विसर्जनानंतर किनार्यावर आलेल्या श्री गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच असण्याची निश्चिती आहे.
बोगमाळो किनार्यावर आलेल्या १६ मूर्ती, तसेच चिखली साकवाखालील (छोट्या पुलाखालील) मूर्ती पुन्हा खोल पाण्यात विसर्जित
बोगमाळो समुद्रकिनार्यावर १ सप्टेंबर या दिवशी दीड दिवसाचे सुमारे ४०० श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बोगमाळो पंचायतीचे सरपंच संकल्प महाले यांनी २ सप्टेंबर या दिवशी सकाळी बोगमाळो समुद्रकिनार्यावर पहाणी केली असता त्यांना सुमारे १६ मूर्ती किनार्यावर आल्याचे आढळून आले. सरपंच संकल्प महाले आणि त्यांचे साथीदार यांनी व्यवस्थितपणे या मूर्ती पाण्यातून वर काढल्या आणि त्यांचे खोल पाण्यात विसर्जन केले. सरपंच संकल्प महाले म्हणाले, ‘‘विसर्जनानंतर किनार्यावर आलेल्या मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असाव्या आणि म्हणून त्या पाण्यात न विरघळता तरंगत किनार्यावर आल्या.’’ तसेच चिखली साकवाखाली विसर्जनानंतर मूर्ती पाण्यात तरंगू लागल्या. सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी या मूर्ती व्यवस्थित काढून त्यांचे योग्यरित्या विसर्जन करण्यासाठी त्या खोल पाण्यात नेल्या. सरपंच संकल्प महाले आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांच्या या कार्याचे स्थानिकांकडून कौतुक केले जात आहे.
संपादकीय भूमिका
|