लोकहो, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? : औषधनिर्मिती आस्थापनांचे ‘ड्रग माफिया’रूपी वास्तव !
‘एखाद्याचे जीवन-मरण कोण ठरवते ?’, असा प्रश्न कुणी विचारला, तर त्याचे उत्तर विश्वास, श्रद्धा किंवा धर्म हे आहे. असे असतांना सध्याच्या महामारीच्या काळात औषधे आणि इंजेक्शने यांचे उत्पादन करणारी मोठी औषधी आस्थापने कुणी मरावे किंवा कुणी जगावे ? हे ठरवत आहेत. त्यामुळे या आस्थापनांचा मानवी जीवनावर मोठा धोकादायक प्रभाव पडत आहे. ही औषधनिर्मिती करणारी मोठी आस्थापने स्वतःचा स्वार्थ साधू पहात आहेत. या व्यवसायामध्ये प्रचंड पैसा ओतत आहेत. ती सरकारला ‘ब्लॅकमेल’ करत आहेत. असमानता, तसेच अनियंत्रित स्थिती निर्माण करत आहेत, औषधांचे मूल्य वाढवत आहेत आणि त्यांचे गुप्त व्यवहार कार्यवाहीत आणत आहेत. अशा स्थितीतही त्यांच्याकडून लस खरेदी करणे, हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे. एकूणच काय, तर या स्थितीमुळे औषधनिर्मिती आस्थापने बलवान झाली आहेत.
१. मोठ्या औषधनिर्मिती आस्थापनांनी रुग्णांचा बळी देऊन औषधांचे मूल्य वाढवणे, त्या पैशाने संपूर्ण व्यवस्था स्वतःच्या कह्यात ठेवणे आणि मार्टिन शक्रेली याने केलेल्या ‘डेराप्रीम’ या औषधाच्या विक्रीतून हा प्रकार उघड होणे
‘डेराप्रीम’ हे औषध मलेरिया आणि ‘एच्.आय.व्ही’ या रोगांवर उपयुक्त आहे. या औषधाची मूळ किंमत १३ डॉलर १५ सेंट (अनुमाने ९७१ रुपये) होती. मार्टिन शक्रेली याने या औषधाच्या निर्मितीचा परवाना मिळवला आणि औषधाची किंमत ५ सहस्र टक्क्यांहून अधिक वाढवून ७५० डॉलर्स (अनुमाने
५६ सहस्र रुपये) केली. त्यामुळे तेथील नागरिक क्षुब्ध झाले, तसेच रुग्ण, आधुनिक वैद्य आणि अधिवक्ते यांनीही त्याचा निषेध केला. त्याचा संपूर्ण अमेरिकेत तिरस्कार केला जातो. शक्रेलीने मात्र याला दाद दिली नाही. या अमानवी कृत्याविषयी न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये शक्रेलीला दोषी ठरवून ७ वर्षांचा कारावास ठोठावला. दर वाढवल्याविषयी अलीकडेच त्याने ४० कोटी डॉलर (३ सहस्र १८८ कोटी रुपयांहून अधिक) दंड भरला. हा माणूस जीव वाचवण्यासाठी औषधांचे उत्पादन करत नव्हता, तर त्याने स्वतःचा खासगी निधी उभारला होता. औषधांचे मूल्य वाढवण्यासंबंधी त्याला विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मी औषधांचे मूल्य आणखी वाढवले असते आणि आणखी लाभ कमावला असता.’’ शक्रेली हा पैसे गुंतवून निधी उभारणार्या आस्थापनाचा व्यवस्थापक असल्याने त्याच्या गुंतवणूकदारांना लाभ करून देणे, हे त्याचे आद्यकर्तव्य झाले होते.
जीवनापेक्षा स्वार्थ आणि लाभ यांचा विचार करणार्या, तसेच आजारावर पैसा मिळवण्याचा विचार करणार्या व्यवस्थेचा अन् सर्वांवर आपला प्रभाव टाकत असलेल्या व्यवस्थेचा तो एक भाग आहे. ही व्यवस्था म्हणजे मोठी औषधनिर्मिती आस्थापने आहेत. त्यांना कुणीही विरोध करू शकत नाही, इतकी त्यांच्याकडे सत्ता आहे. एखादे धोकादायक औषध बाजारात आणणे, राजकारण्यांवर प्रभाव टाकणे आणि रुग्णांचा बळी देऊन औषधांचे मूल्य वाढवणे, अशी सर्व सत्ता या आस्थापनांकडे आहे.
२. आर्थिक लाभासाठी आस्थापनांनी आधुनिक वैद्यांना हाताशी धरून ‘ओपीऑईड’ ची निर्मिती करणे आणि त्याच्या अतीसेवनामुळे केवळ एका वर्षात ७१ सहस्र लोकांचा मृत्यू होणे
खोटी माहिती देणे, हे एक साधन आहे, उदा. अमेरिकेतील ‘ओपीऑईड’ महामारी. ‘ओपीऑईड’ हे वेदनाशामक औषध असून ते हेरॉईनप्रमाणे काम करते. ते वेदनेची जाणीव थांबवते; परंतु त्यामुळे रुग्णाला या औषधाची सवय होते. पूर्वी अमेरिकेत ‘ओपीऑईड’ औषध कुणाला दिले गेले नाही ना, याविषयी सतर्कता बाळगली जायची. वर्ष १९९० मध्ये औषध आस्थापनांनी या औषधाच्या विक्रीला प्रोत्साहन दिले. त्यांनी ‘ओपीऑईड’ औषधाची रुग्णाला सवय होत नाही’, असा प्रचार चालू केला, विक्रेत्यांच्या माध्यमातून आधुनिक वैद्यांना या औषधाचे महत्त्व पटवून दिले. ‘ओपीऑईड’ औषध अधिक मात्रेने देण्यास प्रवृत्त करणे, हा त्यांचा यामागील हेतू होता. या सर्वांमागे ‘परड्यू फार्मा’ या आस्थापनाचा हात होता. त्यांच्या ‘ऑक्सिकॉन्टीन’ नावाच्या औषधामध्ये ‘ओपीऑईड’ होते. या आस्थापनाने ‘या औषधाची रुग्णाला सवय होत नाही’, असा दावा केला. प्रत्यक्षात आस्थापनाने कोणतेही संशोधन केलेले नव्हते. आधुनिक वैद्यांनीही त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. वर्ष १९९७ मध्ये ६ लाख ७० सहस्र रुग्णांना हे औषध लिहून देण्यात आले. वर्ष २००२ मध्ये ही संख्या ६२ लाख एवढी झाली. यामुळे आस्थापनाने भरपूर नफा कमावला. त्यातून आस्थापनाला ३ अब्ज डॉलर (अनुमाने २२ सहस्र २०० कोटी रुपये) एवढा महसूल मिळाला. ‘परड्यू फार्मा’प्रमाणेच ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आणि ‘टिवा’ ही आस्थापनेही ‘ओपीऑईड’ या औषधाचे उत्पादन करत होती. वर्ष २०१२ मध्ये अमेरिकेतील आधुनिक वैद्य एका वर्षात २५ कोटी ५० लाख रुग्णांना ‘ओपीऑईड’ हे औषध लिहून द्यायचे. त्यामुळे सहस्रो रुग्णांना या औषधाचे व्यसन लागले. वर्ष १९९९ ते २०१६ या कालावधीत अमेरिकेतील अनुमाने ४ लाख ५० सहस्रांहून अधिक नागरिक ‘ओपीऑईड’ औषधाच्या अतीसेवनामुळे मरण पावले. वर्ष २०१९ मध्ये औषधाच्या अतीसेवनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये ७१ सहस्र मृत्यू ‘ओपीऑईड’च्या अतीसेवनामुळे झाले आहेत.
२ अ. बिंग उघडकीस आल्यावर आस्थापनाने कर्जबाजारी झाल्याचे सांगून केवळ काही प्रमाणातच दंडाची रक्कम भरणे : या सगळ्या महामारीला ‘परड्यू फार्मा’च उत्तरदायी आहे, हे सर्वांच्या लक्षात आल्यावर त्या आस्थापनाने कर्जबाजारी झाल्याची घोषणा केली. या आस्थापनाच्या मालकांना महामारी पसरवल्याविषयी कारावासात न पाठवता केवळ दंड ठोठावण्यात आला. त्यांना शिक्षा होण्याऐवजी संरक्षण देण्यात आले. कर्जबाजारी होण्यापूर्वी त्यांनी आस्थापनाच्या खात्यातील ११ अब्ज डॉलर्स (अनुमाने ८७ सहस्र ६८३ कोटी रुपयांहून अधिक) रोख स्वरूपात काढले. जेव्हा त्यांना दंडाची रक्कम भरावी लागली, तेव्हा त्यांनी केवळ ४ अब्ज ५० कोटी डॉलर्स (अनुमाने ३५ सहस्र ८७० कोटी रुपयांहून अधिक) भरले.
३. ‘फूड अँड ड्रग सोसिएशन’ने आर्थिक लाभासाठी औषधनिर्मिती आस्थापनाच्या अयोग्य औषधाला मान्यता देणे
‘एड्यूहेल्म’ या औषधाला अमेरिकेतील ‘फूड अँड ड्रग असोसिएशन’ने मान्यता दिली. या औषधाचे उत्पादन ‘बायोजेन’ करत असून हे औषध ‘ॲल्झायमर्स’ या आजारावर वापरले जाते. ५६ सहस्र डॉलर्स (४१ लाख ४४ सहस्र रुपये) प्रतिवर्ष या किमतीला हे औषध बाजारात आणले गेले; पण या औषधामुळे ‘ॲल्झायमर्स’ आजार बरा होतो, याचा पुरावा अल्प प्रमाणात आहे. या औषधाची ‘फूड अँड ड्रग असोसिएशन’च्या ११ सदस्यीय सल्लागार समितीने चाचणी केली. ११ सल्लागारांपैकी एकानेही या औषधाला मान्यता देण्यास होकार दर्शवला नाही. सर्वसाधारणपणे हे असोसिएशन त्याच्या सल्लागार समितीचा सल्ला मानते. यासंदर्भात मात्र असोसिएशनने न ऐकता औषधाला मान्यता दिली. ‘बायोजेन’ आस्थापन आणि असोसिएशन यांचे जवळचे संबंध होते. हा निर्णय होण्यापूर्वी बायोजेनच्या अधिकार्यांनी असोसिएशनच्या अधिकार्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे या औषधाला मान्यता देण्यात आली. या वादग्रस्त निर्णयामुळे असोसिएशनच्या सल्लागार समितीमधील तिघांनी त्यागपत्र दिले. यांपैकी एकाने सांगितले की, असोसिएशनच्या निर्णयामध्ये सल्लागार समितीच्या सूचना ग्राह्य धरल्या गेल्या नाहीत. असोसिएशनने त्याच्या सल्लागारांचे न ऐकता औषध आस्थापनाचे ऐकणे महत्त्वाचे मानले.
यासंदर्भात अन्वेषण करण्यात आले. असोसिएशनने औषधनिर्मितीवर लक्ष ठेवायला हवे. प्रत्यक्षात संघटनेने औषधांच्या आस्थापनाशीच जवळचे संबंध ठेवले. यामागील खरे कारण, म्हणजे असोसिएशनच्या अर्थसंकल्पापैकी ४५ टक्के निधी हा अशा आस्थापनांकडून येतो.
४. मोठी औषधनिर्मिती आस्थापने म्हणजे ‘ड्रग माफिया’च असणे
अमेरिकेतील कायदे सिद्ध करणार्यांनीही ही व्यवस्था अशीच चालू ठेवली आहे. मोठ्या औषधनिर्मिती आस्थापनांचा अमेरिकेतील काँग्रेसवरही प्रभाव आहे; कारण ही आस्थापने राजकारण्यांना पैसा पुरवतात. वर्ष २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत या आस्थापनांनी ३५६ राजकारण्यांच्या नावे धनादेश दिले. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी १ कोटी १० लाख डॉलर्स (अनुमाने ८१ कोटी ४० लाख रुपये) दिले. गेल्या२३ वर्षांत या आस्थापनांनी त्यांची लॉबी सिद्ध करण्यासाठी अनुमाने ५ अब्ज डॉलर्स (अनुमाने ४० सहस्र कोटी रुपये) व्यय केले आहेत. कायद्याने ही मोठी आस्थापने त्यांच्या औषधांच्या किमती ठरवू शकतात. त्यांना हवी ती किंमत ते ठेवू शकतात. याला काही राजकारण्यांनी विरोध केल्यावर आस्थापने म्हणाली, ‘‘कोणते औषध मिळावे किंवा मिळू नये, हे राजकारणी ठरवणार असतील, तर काँग्रेसला सांगा की, तुमची औषधे घेऊन आधुनिक वैद्यांशी खेळू नका.’’ स्पर्धा करणार्याला बाहेर ठेवणे, उत्पादनांच्या किमती ठरवणे, राजकारण्यांवर प्रभाव टाकणे आणि कोणतेही आव्हान समोर आले, तर अधिवक्त्यांची फौज उभी करणे, हे सर्व एका व्यवसायासारखे आहे अन् तो म्हणजे अमली पदार्थांचा व्यवसाय ! त्यामुळे ही मोठी औषधनिर्मिती आस्थापने म्हणजे ‘ड्रग माफिया’च ठरतात.’
– पल्की शर्मा उपाध्याय, वृत्त निवेदिका आणि पत्रकार
(साभार : ‘WIONews’ वृत्तवाहिनी)
संपादकीय भुमिकालक्षावधी लोकांच्या जीविताशी खेळणार्या मोठ्या औषधी आस्थापनांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी नि:स्वार्थी जागतिक संघटन आवश्यक ! |