प्राध्यापक : भारतीय उपखंडातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक !

५ सप्टेंबर या दिवशी (उद्या) शिक्षकदिन आहे. त्या निमित्ताने…

महाविद्यालयात अध्ययन आणि अध्यापन करत असतांना आलेले अनुभव !

भारताला अधोगतीला घेऊन जाण्याचे मूळ हे शिक्षणव्यवस्थेत असल्याने त्यामध्ये आमूलाग्र पालट होणे अत्यावश्यक !

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करणार्‍या ध्येयवेड्या प्राध्यापक वर्गाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. स्वातंत्र्यानंतरही २-३ दशके प्राध्यापकांचे वर्तन नैतिकदृष्ट्या आदर्श होते. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी आदर वाटत असे. काळानुसार संस्थाचालक, प्राध्यापक आणि एकूणच उच्चशिक्षण यांचे गतीने अध:पतन होत गेले. याचे साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एके ठिकाणी ‘भारतीय उपखंडातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक म्हणजे प्राध्यापक !’, असे समर्पक वर्णन केले आहे.

मी १४ वर्षे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले. या काळात आणि माझ्या ५ वर्षांच्या महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी म्हणून मी जे अनुभवले, त्यातून उच्चशिक्षणात मूल्यांचा र्‍हास होत असल्याचे मला जाणवले. त्याला काही प्राध्यापक, सेवक आणि विद्यार्थी यांचा अपवाद आहे; परंतु त्याचे प्रमाण फारच अल्प आहे. ते पहाता ‘आभाळच फाटले आहे, तर ठिगळ कुठे कुठे लावणार ?,’ अशी उच्चशिक्षणाची सद्यःस्थिती आहे.

या लेखातील निवडक प्रातिनिधिक अनुभव शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र पालट घडवण्याची आवश्यकता स्पष्ट करतो. मुळात साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या मानसिकतेमधून ‘बाबू’ (कारकून) निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था पालटण्यासाठी केवळ मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे ठरतील का ? शिक्षणक्षेत्रासह समाजातील प्रत्येक क्षेत्रात एतद्देशीय पालट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कृती होणे, तेवढेच आवश्यक आहे.

प्रा. महावीर श्रीश्रीमाळ

 

हिंदु राष्ट्रात केवळ गुरुकुल पद्धतीने शिकवणारे सात्त्विक आचार्य (प्राध्यापक) अध्यापनासाठी असतील !

सध्याच्या शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार, अपलाभ आणि व्यसनी वृत्ती असलेले काही प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचारी आहेत. ज्यामुळे शिक्षणक्षेत्रासारखे पवित्र कार्य कलंकित होत आहे. शिक्षणक्षेत्र पुन्हा पवित्र करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’च हवे. हिंदु राष्ट्रात गुरुकुल पद्धतीने शिकवणारे आचार्य म्हणजेच केवळ सात्त्विक प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक असतील. ही शिक्षणव्यवस्था शिक्षणसम्राटांच्या पायावर नव्हे, तर समाज-राष्ट्र यांचे हित जपणार्‍या आदर्श गुरुकुल पद्धतीवर आधारित असेल आणि त्याद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास करून घेतला जाईल !

१. प्राध्यापकांवरील प्रभावहीन नियंत्रण

भारतात उच्चशिक्षणाचे दिशादर्शन ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’कडून (‘यू.जी.सी.’कडून) केले जाते. राज्यघटनेनुसार केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यात उच्चशिक्षण हा विषय राज्यसूचीत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे त्याचे संचालन आणि यातील सेवकांचे वेतन राज्यशासनाकडून केले जाते. महाविद्यालयीन प्राध्यापक आणि सेवक यांची भरती स्थानिक विद्यापीठ अन् ‘सहसंचालक, उच्चशिक्षण खाते आणि राज्यशासन’ यांच्या निर्देशानुसार होते. प्रत्यक्षात प्राध्यापक आणि सेवक यांच्या कामगिरीचे निरीक्षण संस्थाचालक अन् प्राचार्य हे करत असतात. अशा प्रकारे प्राध्यापक वर्गाची बांधिलकी विविध घटकांशी असल्याने त्यांच्यावर नेमके कुणा एका घटकाचे नियंत्रण नाही. त्यातून प्राध्यापक आणि सेवक वर्ग यांना पळवाटा काढणे सहज शक्य होते. राज्यशासन, उच्चशिक्षण खाते, विद्यापिठाची यंत्रणा, संस्थाचालक, पालक आणि युवा विद्यार्थी असे उच्चशिक्षणाचे विविध घटक हे प्राध्यापक वर्गाशी स्वतःचे हितसंबंध जपत असतात. त्यामुळे प्राध्यापक वर्गाच्या सार्वजनिक वर्तनावर प्रभावी नियंत्रण अपवादाने राखले जाते.

२. प्राध्यापक भरतीमधील अपप्रकार

प्राध्यापकांचा कार्यभार आणि त्यांची पदसंख्या संबंधित विद्यापीठ आणि उच्चशिक्षण खाते यांच्याकडून निश्चित केली जाते. प्राध्यापकांची नेमणूक करतांना त्या क्षेत्रातील विद्यापीठ आणि उच्चशिक्षण खात्याचे सहसंचालक यांच्याकडून मान्यता घ्यावी लागते. प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठी विद्यापीठ, सहसंचालक विभाग आणि महाविद्यालयाचे संस्थाचालक यांचे प्रतिनिधी असे मिळून ५ हून अधिक जणांचे ‘पॅनल’ (समिती) असते. या निवड प्रक्रियेतील अपप्रकाराचे काही अनुभव पुढे दिले आहेत.

२ अ. उमेदवार प्राध्यापकांना ताटकळत ठेवणे : एका नामवंत महाविद्यालयात मुलाखतीसाठी उमेदवारांना सकाळी ११ वाजता त्यांना बोलावण्यात आले दुपारी २ वाजेपर्यंत कोणताही निरोप दिला गेला नाही. चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ‘गरजवंताला अक्कल नसते’, अशा प्रकारचे वातावरण मुलाखतीच्या ठिकाणी होते.

२ आ. एका महाविद्यालयात मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना ५ घंटे ताटकळत ठेवले जाणे आणि त्याविषयी जाब विचारणार्‍या उमेदवाराला सचिवांनी उद्दामपणे उत्तर देणे : एका तालुक्यातील महाविद्यालयात उमेदवारांना सकाळी १० ते दुपारी ३ असे ५ घंटे ताटकळत ठेवण्यात आले; पण मुलाखत कधी घेतली जाणार ? हे सांगितले नाही. त्या वेळी मुलाखत हा एक देखावा असून तेथे महाविद्यालयाच्या नियामक मंडळावर असलेल्या पदाधिकार्‍याच्या भाच्याची निवड होणार असल्याचे समजले. तेव्हा मी ‘मुलाखतीचा देखावा करून ‘होतकरू युवकांचा वेळ का घालवत आहात ?’, असा जाब विचारला. त्यामुळे तेथील पदाधिकारी आणि सेवक वर्ग अप्रसन्न झाले. थोड्या वेळाने मुलाखतीला आरंभ झाला. त्यांनी मला विचारले, ‘‘आपणच ताटकळत थांबल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली का ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘बेरोजगार आणि होतकरू असणे वाईट आहे का ? सुशिक्षित उमेदवारांना सन्मानाने वागवायला हवे.’’ तेव्हा सचिव म्हणाले, ‘‘तुमची मुलाखत घ्यायची कि नाही ? हे आमच्यावर अवलंबून आहे.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही पदासाठी आणखी कुणाची निवड केली असली, तरी सभ्यता आणि नियम म्हणून तुम्ही आलेल्या उमेदवारांची मुलाखत घ्यायला हवी. तितका संकेत तुम्ही पाळाल, अशी आशा आहे.’’ त्यानंतर त्यांनी माझी मुलाखत घेतली.

२ इ. महाविद्यालयाच्या सचिवाने नेमणुकीसाठी पैशांची मागणी करणे : एका राजकीय पक्षाच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्ष एका जिल्ह्यातील तालुकास्तरीय महाविद्यालयाचे सचिव होते. ‘तुम्ही निकषानुसार पात्र असून प्राध्यापक पदावर तुमची निवड होऊ शकते. २-३ लाख रुपये भरण्यास सिद्ध असाल, तर तुम्ही मुलाखतीला अवश्य या, अन्यथा नाही आलात, तरी चालेल’, असा उघड प्रस्ताव त्यांनी मला दूरभाषवर दिला. ‘पैसे भरण्यासाठी सिद्ध असाल, तरच दूरभाष करून या,’ असेही सुचवले.

२ ई. एका महाविद्यालयात प्रभावशाली नेत्याच्या सांगण्यावरून प्राध्यापकपदाची निवड करण्यात येणे : अन्य एका तालुक्यातील जैन अल्पसंख्यांक महाविद्यालयात मला मुलाखतीसाठी बोलावले होते. मी जैन असल्याने या पदावर निवड होण्याची दाट शक्यता होती; परंतु विषयतज्ञ प्राध्यापकांनी मला सांगितले, ‘या पदावर अन्य उमेदवाराची निवड जवळपास झाली आहे. त्याचे एक नातेवाईक साखर कारखाना संचालक असून त्यांनी राज्यातील प्रभावी राजकीय नेत्याकडून संस्थाचालकांना संबंधित उमेदवाराची निवड करण्यास सुचवले आहे. त्यामुळे तू मुलाखतीला आला नाहीस, तर बरे होईल.’

२ उ. कायमस्वरूपी प्राध्यापक पदाच्या नोकरीसाठी उमेदवाराने लग्नात हुंडा घेऊन संस्थाचालकाला पैसे देणे : तासिका तत्त्वावर (अस्थायी तत्त्वावर) सेवेत असलेल्या एका सहकार्‍याची प्राध्यापक पदासाठी कायमस्वरूपी निवड झाली. त्या वेळी तेथील संस्थाचालकाने मागितलेली ५ लाख रुपयांची देणगी देण्यासाठी सहकार्‍याकडे पैसे नव्हते. तेव्हा त्याने त्याच्या नात्यातील एका युवतीशी हुंडा घेऊन विवाह केला आणि हुंड्याचे पैसे महाविद्यालयात देणगी म्हणून दिले.

२ ऊ. प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला अन्य उमेदवाराने त्रास देणे : एका महाविद्यालयात माझी निवड झाली होती. त्यानंतर तेथे मी रुजू होऊ नये, यासाठी माझ्या सहकारी उमेदवाराने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मी या महाविद्यालयात मुलाखत दिल्यानंतर त्या उमेदवाराच्या भावाने बसस्थानकापर्यंत माझा पाठलाग केला. बस मार्गस्थ होईपर्यंत ‘तुम्ही इकडे येणे योग्य नाही. इकडचे वातावरण-राजकारण तुम्हाला मानवणार नाही,’ असे सांगून न येण्याचे सुचवले. मी घरी पोचल्यानंतरही त्या उमेदवाराने मला दूरभाष करून माझे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला. त्या महाविद्यालयात निवड झाल्याने मी तेथे रुजू झालो. त्यानंतरही संबंधित उमेदवाराने शहरातील माझ्या घरासमोर मद्यपान करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या घरमालक असलेल्या मावशींनी त्या युवकाला चांगले खडसावले आणि पुन्हा दमदाटी न करण्याची ताकीद दिली. त्या युवकाचे राजकीय वजन होते, तसेच मी काही कृती केल्यास ‘ॲट्रॉसिटी कायद्या’नुसार माझ्यावर खोटी कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळे मला काळजी घ्यावी लागत होती.

३. वेळापत्रकातील गोंधळ आणि प्राध्यापकांची तासिका टाळण्याची मानसिकता

३ अ. प्राध्यापकांनी एका दिवसाच्या तासिकांच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून शिकवणे आणि त्यामुळे ते दोघेही तासिकांच्या वेळी अनुपस्थित रहाणे : महाविद्यालयातील प्राध्यापकाला त्याच्या हुद्यानुसार प्रत्येक आठवड्यात १६ ते २० तासिका घेण्याचा कार्यभाग असतो. एका महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुखाने प्रथम वर्षाच्या कला शाखेच्या ४ तुकड्यांना शिकवण्यासाठी त्याच्याकडे प्रत्येकी ४ अशा १६ तासिकांचा कार्यभाग घेतला. ते प्राध्यापक सकाळी लवकर एका वर्गात तासिका घेऊन अन्य ३ तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना या तुकडीत उपस्थित रहाण्यास सांगत असत. एका वर्गात विद्यार्थी संख्या १२० असे; मात्र प्रत्यक्ष वर्गात ४ तुकड्यांचे मिळून अनुमाने एक वर्गाची संख्या भरेल, इतकेच विद्यार्थी उपस्थित रहात असत. यात प्राध्यापकांना १६ तासिका घेण्याऐवजी ४ तासिका घेऊन कार्यभाग पूर्ण करण्याची, तर विद्यार्थ्यांना तासिका बुडवण्याची आयतीच संधी मिळत असे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’, असे बिनबोभाट काम चालत असे. अशा अन्य काही क्लृप्त्या वापरून प्राध्यापकांनी वर्गावर न जाणे आणि विद्यार्थ्यांनीही तासिका बुडवणे आदी अपप्रकार काही अपवाद वगळता अनेक ठिकाणी चालू असतात.

३ आ. वरिष्ठ महाविद्यालयात तासिका घेतांना अध्यापन, गटचर्चा, सादरीकरण यांवर भर देऊन विद्यार्थ्यांना टिपण (नोटस्) काढण्यास सांगून प्रवृत्त करणे अपेक्षित आहे; परंतु काही प्राध्यापक हे वर्गात नाममात्र अध्यापन करून टिपण लिहून देण्यास वेळ देत असत. प्राध्यापकांचे अधिकचे अध्ययन करण्याचे आणि विद्यार्थ्यांचे टिपण काढण्याचे श्रम वाचत असत. त्याचा प्रतिकूल परिणाम शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा क्षमताविकास यांवर होतो.

३ इ. महाविद्यालयात ४ तासिकांपैकी प्रत्यक्षात १ तासिका न होताही ती कागदोपत्री दाखवण्यात येणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार कला शाखेच्या प्रत्येक विषयासाठी प्रतिसप्ताह ४ तासिका असाव्यात. महाविद्यालयांमध्ये अनेक वैकल्पिक विषय असल्याने ठराविक वेळेनंतर (अनुमाने सकाळी ११.३० किंवा दुपारी १२ नंतर) प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची महाविद्यालयात थांबण्याची सिद्धता नसे. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या ३ तासिका घेऊन ४ थी तासिका वेळापत्रकात शेवटी ठेवली जात असे. ही तासिका प्रत्यक्षात न होताही कागदोपत्री दाखवण्यात येत असे. अन्य ३ तासिकांच्या उपस्थितीनुसार या ४ थ्या तासिकेच्या विद्यार्थ्यांची अनुमाने उपस्थिती लावली जाई.

३ ई. महाविद्यालयात नियमित शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती ७५ टक्के असल्यावरच त्यांना परीक्षा देता येत असे; मात्र विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर प्राध्यापक आणि सेवक यांची संख्या अवलंबून असते. त्यामुळे कित्येक विद्यार्थी वर्गात अनुपस्थित असूनही त्यांची खोटी उपस्थिती दाखवून त्यांना परीक्षा देण्याची अनुमती दिली जात असे.

३ उ. प्राध्यापकांनी नियोजित वेळेत तासिका न घेणे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची हानी होणे : एका महाविद्यालयात नियोजित वेळेत प्राध्यापक वर्गात आले नाहीत. त्यामुळे तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने त्यांना प्राध्यापकांच्या दालनात जाऊन तासिका घेण्याविषयी विचारले. तेव्हा प्राध्यापक म्हणाले, ‘‘निकाल लागल्यानंतर नुकतेच महाविद्यालय चालू झाले आहे. तू अद्याप प्रवेश शुल्कही (फी) भरलेले नाही; पण तासिका घेण्याची घाई बरी करते ?’’ हे ऐकल्यावर ती विद्यार्थिनी तेथून निघून गेली. काही विद्यार्थी २० ते २५ किलोमीटर प्रवास करून महाविद्यालयात येत असत. अचानक तासिका रहित केल्याने त्यांचा प्रवासाचा खर्च वाया जात असे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकांना म्हटले, ‘सर, तासिका होणार नाही, हे आम्हाला निदान आदल्या दिवशी समजले, तर आम्ही घरी थांबून काही कामे तरी करू शकू.’

(क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)

– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा. (३०.८.२०२२)

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना आवाहन

शिक्षणक्षेत्रातील चांगले आणि कटू अनुभव आले असल्यास ते आम्हाला अवश्य पाठवा !

या लेखात म्हटल्याप्रमाणे शिक्षणक्षेत्राविषयी कुणालाही चांगले अथवा कटू अनुभव आले असल्यास अवश्य कळवा. हे अनुभव प्रसिद्ध करतांना तुमचे नाव पाहिजे असल्यास गोपनीय ठेवू.

सुराज्य अभियान

टपालाचा पत्ता – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ‘मधुस्मृती’ घर क्र. ४५७, पहिला मजला, बैठक सभागृह, सत्यनारायण मंदिराजवळ, ढवळी, फोंडा, गोवा – ४०३४०१

संपर्क : ९५९५९८४८४४

संगणकीय पत्ता – socialchange.n@gmail.com