विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू ! – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २ सप्टेंबर (वार्ता.) – इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास पुरातत्व विभागाकडून विलंब होत असून विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांनी दिली. श्री. युवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली येथील विठ्ठल मंदिरशेजारी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी ही चेतावणी दिली. या वेळी पुरातत्व विभागाचे श्राद्ध घालण्यात आले. मनसे शाहूवाडी तालुकाध्यक्ष धनाजी आगलावे यांनी मुंडण केले. या वेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनासाठी मनसे शाहूवाडी विभागप्रमुख श्री. प्रदीप वीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, सर्वश्री शिवाजी फिरके, कुणाल काळे, संजय पाटील, जयसिंग पाटील, अधिवक्ता रोहित जांभळे यांसह एकूण १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
पुरातत्व विभाग कागदोपत्री घोडे नाचवण्याच्या पलीकडे काही करत नाही ! – बाबासाहेब भोपळे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीया प्रसंगी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे म्हणाले, ‘‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने विशाळगडावर झालेले अतिक्रमण आणि मंदिरे, समाध्या यांची दुरवस्था या संदर्भात गेल्या वर्षभरापासून आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या रेट्यामुळे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे पुरातत्व विभागाने गडावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या; मात्र या नोटिसांवर पुढे कोणतीच कृती झालेली नाही. या संदर्भात पुरातत्व विभागाचीही भूमिका ‘नरो वा कुंजरोवा’, अशी आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याच्या पलीकडे काहीच कृती होत नाही, असे दिसून येत आहे.’’ |