नगर येथे गणेशोत्सव मंडळे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर पोलिसांनी दिली मिरवणुकीस अनुमती !
नगर – येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गणेशोत्सवानिमित्त शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीमध्ये काही गणेशोत्सव मंडळांना स्थापनादिनाच्या दिवशी मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारण्यात आली आणि ‘मिरवणूक काढली, तर कारवाई करू’, असा दम देण्यात आला. या घटनेमुळे संतप्त झालेले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गणेशोत्सवाच्या दिवशी स्थापना मिरवणूक काढण्यास निवेदनाद्वारे अनुमती मागितली. यानंतर पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांनी मिरवणूक काढण्यास अनुमती दिली. यामुळे जागृत अशा बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांचे सर्व गणेशभक्तांनी आभार मानले आणि गणेश स्थापनादिनी गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत आपापल्या पद्धतीने मिरवणूक काढून श्री गणेशाची स्थापना केली.
निवेदन देतांना बजरंग दलचे कुणाल भंडारी, केशव मोकाटे, दर्शन बोरा, अभिषेक हरबा, हिंदु जनजागृती समितीचे रामेश्वर भूकन हे उपस्थित होते.