नागपूर येथे नैसर्गिक पद्धतीने पूर्ण नष्ट होणार्या श्री गणेशमूर्तींनाच शासनाची अनुमती !
|
नागपूर – ‘राज्यात नैसर्गिक पद्धतीने पूर्णपणे नष्ट होणार्या श्री गणेशमूर्तींनाच अनुमती दिली जाईल. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) श्री गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात येणार आहे, असे आगामी गणेशोत्सवाविषयी राज्यशासनाने तात्पुरते धोरण सिद्ध केले आहे. राज्यशासनाने २९ ऑगस्ट या दिवशी हे धोरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात मांडले आहे. त्यामुळे राज्यात ‘पीओपी’च्या श्री गणेशमूर्तींवरील बंदी कायम रहाण्याची शक्यता आहे. या संदर्भात राज्यशासन येत्या काही मासांत कायमस्वरूपी धोरण सिद्ध करणार आहे. या प्रकरणातील सर्व पक्षकारांना कायमस्वरूपी धोरणासाठी स्वतःचे मत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे तात्पुरते धोरण ?
श्री गणेशमूर्तीच्या आत भरण्यासाठी पेंढा, वाळलेली फुले, नैसर्गिक रंग, रासायनिक रंग यांचा वापर करण्यास बंदी आहे. १०० हून अधिक मूर्ती बनवणार्या मूर्तीकारांना महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासन मूर्तीकारांची आगाऊ रक्कम (डिपॉझिट) जप्त करेल आणि त्याच्यावर किमान २ वर्षांची बंदी घालेल. श्री गणेशमूर्ती सजावट किंवा मंडप यामध्ये एकदा वापरता येणारे प्लास्टिक आणि थर्माकोल यावरही बंदी आहे.
अशा पद्धतीने सामान्य घरांसाठी, गणेशोत्सव मंडळांसाठी आणि नगरपालिका यांसाठी शासनाने सूचना केल्या आहेत. उच्च न्यायालयाने नागपूर महापालिकेला हे धोरण नागपूर येथे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काही मासांत कायमस्वरूपी धोरण सिद्ध केले जाणार आहे.
भद्रावती येथून ‘पीओपी’च्या ११ श्री गणेशमूर्ती जप्तभद्रावती (जिल्हा चंद्रपूर), ३ सप्टेंबर (वार्ता.) – येथील मनोज बोरसरे या श्री गणेशमूर्ती विक्रेत्याकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (‘पीओपी’च्या) ११ श्री गणेशमूर्ती कुंभार मोहल्ला येथून जप्त करण्यात आल्या. नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. ‘पीओपी’च्या मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नसून त्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात, त्यामुळे अशा मूर्तींची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे. |