कठीण प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर आणि सकारात्मक राहिल्याचे साधिकेने अनुभवणे !
ऑगस्ट २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांचे अनेक अवयव (किडनी (मूत्रपिंड), लिव्हर (यकृत) आणि हृदय) कमकुवत झाल्याने त्या प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. गुरुकृपेने त्या यातून बर्या झाल्या. त्या रुग्णाईत असतांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती आतापर्यंत आपण पहिल्या. आज कु. माधुरी दुसे (लहान मुलगी) यांना कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/609511.html
१. श्री. दत्तात्रय दुसे (वडील)
आई रुग्णाईत असतांना एकदा बाबा पुष्कळ भावनिक झाले; पण नंतर त्यांनी स्वतःला सावरले. त्याच कालावधीत त्यांचा अपघात झाला, तरीही ते गुरूंप्रती असलेल्या श्रद्धेमुळे स्थिर होते. दादाने आईला नागपूर येथील रुग्णालयात नेल्यावर घरी मी आणि बाबा, असे दोघेच होतो. तेव्हा मला एकटीला सर्व करायला लागू नये; म्हणून त्यांनी मला आवश्यक तेथे साहाय्य केले.
२. सौ. वसुधा राठीवडेकर (मोठी बहीण)
आईची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. त्याच वेळी ताईच्या मुलाला ताप आल्याने त्याला रुग्णालयामध्ये भरती करावे लागले. त्यामुळे ताई त्याच्या समवेत रुग्णालयामध्येच होती. तिला रात्रंदिवस झोप नव्हती. तिला तिच्या मुलाकडेही लक्ष द्यावे लागायचे, तरी ती स्थिर असायची. ‘आई आणि मुलगा यांना परात्पर गुरुदेवच सांभाळतील’, असा भाव तिच्या मनात असायचा.
३. श्री. किरण दुसे (मोठा भाऊ)
अ. दादाने आईला केवळ तपासणीसाठी रुग्णालयामध्ये नेले होते; पण तेथे गेल्यावर आईला रुग्णालयात भरती करावे लागले. आधुनिक वैद्यांनी ‘आई वाचण्याची शक्यता अल्प आहे’, असे दादाला सांगितले होते, तरीही तो स्वतः स्थिर राहून आम्हाला समजावून सांगत होता.
आ. एकदा बाबा पुष्कळ भावनिक झाले होते. तेव्हा दादाने त्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेल्या ‘सकारात्मक रहा. गुरुस्मरण करा. प्रारब्ध आपल्या हातात नाही’, या वाक्याची आठवण करून दिली आणि सद्गुरु स्वाती खाडये यांच्याशी भ्रमणभाषद्वारे बोलण्यास सांगितले. वडील मुलाला सांभाळतात, तसे दादाने बाबांना सांभाळले.
इ. दादाने घरच्यांच्या आजारपणाचे प्रसंग यापूर्वी कधी पाहिले नव्हते, तरी त्याने ‘गुरुदेव आपल्यासह आहेत’, या भावाने दायित्व घेऊन सर्व केले.
४. सौ. काव्या दुसे (वहिनी)
वहिनी प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक होत्या आणि आईची मुलीप्रमाणे सेवा करत होत्या.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरुदेव, तुम्ही करत असलेल्या कृपेविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अत्यल्पच आहे. ‘तुमची कृपा अनुभवण्यासाठी आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत साधना करून घ्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– कु. माधुरी दत्तात्रय दुसे (लहान मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(सर्व सूत्रांचा मास : डिसेंबर २०२१)
संतांची अनुभवलेली प्रीती !
१. रामनाथी आश्रमातून घरी जायला निघतांना पू. रेखा काणकोणकर यांनी प्रेमाने आईविषयी विचारपूस करून प्रवासातील जेवणाच्या डब्याचे नियोजन करणे : ‘आईला रुग्णालयात भरती केले आहे आणि तिची परिस्थिती नाजूक आहे’, असे कळल्यावर मी रामनाथी आश्रमातून अमरावतीला घरी जाण्यास निघणार होते. हे पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या संत) यांना कळल्यावर त्या स्वतःहून माझ्याकडे आल्या आणि त्यांनी आईविषयी विचारपूस केली. त्यांनी ‘प्रवासामध्ये नेण्यासाठी डब्याचे नियोजन केले आहे का ?’, असे विचारून ‘प्रवासात काय खाऊ नेऊ शकते ?’, हे मला सांगितले.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आई आणि कुटुंबीय यांच्यासाठी नामजपादी उपाय सांगणे : आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिच्या स्थितीनुरूप नामजपादी उपाय सांगितले. त्यामुळे आमची काळजी न्यून झाली. त्यांनी आम्हालाही उपाय सांगून साहाय्य केले. याविषयी मी त्यांना ‘कृतज्ञता’ म्हटल्यावर ते मला म्हणाले, ‘‘ही माझी सेवाच आहे.’’
– कु. माधुरी दत्तात्रय दुसे, , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.