‘हिंदुद्वेष्टा’ पुरातत्व विभाग !
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे; मात्र अनेक वेळा तक्रार करूनही पुरातत्व विभाग मंदिराकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. यामुळे एका भाविकाने स्वखर्चाने श्री गणेश मंदिरामध्ये लाद्या बसवल्या. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री सिद्धेश्वर मंदिरातील भाविकाने बसवलेल्या लाद्या पुरातत्व विभागाने काढून टाकल्या. ऐन चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश मंदिरात झालेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही भारताच्या सांस्कृतिक वारशाचे पुरातत्व संशोधन आणि संवर्धन करणारी प्रमुख संस्था आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अन् राष्ट्रीय महत्त्व असलेल्या अवशेषांची देखभाल करणे, हे तिचे मुख्य कार्य आहे.
‘एखादी वास्तू किंवा मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्यास विभागाच्या अनुमतीविना कुणालाच बांधकाम करता येत नाही’, हा पुरातत्व विभागाचा नियम आहे. या नियमाप्रमाणे विभागाच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेश मंदिरातील लाद्या काढल्या असाव्यात; मात्र गणेशभक्तांकडून स्वखर्चाने लाद्या बसवतांना या विभागातील अधिकारी कुठे गेले होते ? हाच नियम विभागाकडून अन्य ठिकाणी होणार्या अवैध बांधकामाच्या संदर्भात लागू का केला जात नाही ? यासमवेतच नेमके श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच लाद्या का काढण्यात आल्या ? विशाळगड, लोहगड यांसारख्या अनेक गडांवर धर्मांधांनी अवैध बांधकामे केली आहेत. याविषयी पुरातत्व विभागाकडे अनेक तक्रारी येऊनही याच तत्परतेने कारवाई का केली जात नाही ? यामागे पुरातत्व विभागाचा हिंदु समाज आणि अन्य धर्मीय यांच्यासंदर्भातील सोयीस्कर दुजाभाव अन् हिंदुद्वेष्टेपणाच आहे, असे कुणी म्हटल्यास वावगे ठरू नये ! आतापर्यंत अनेक वेळा कारवाई न करण्याविषयी पुरातत्व विभागाने पोलीस संरक्षण मिळत नसल्याचे कारण पुढे करून अतिक्रमण हटवण्याचे टाळले आहे. ‘कुठे आणि कधी काय करावे ? याचे भान नसणारे पुरातत्व’, अशी विभागाची प्रतिमा झाली आहे, हेच खरे !
माचणूर येथे पुरातत्व विभागाने केलेल्या कारवाईनंतर संतप्त ग्रामस्थांनी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या सहिष्णु वृत्तीचा अपलाभ घेण्याचा पुरातत्व विभागाने प्रयत्न करू नये. याउलट सर्वांना समान नियम लावून त्यानुसार कार्यवाही करण्याची तत्परता दाखवावी, हीच अपेक्षा !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर