श्रीरामपूर (नगर) येथे ‘लव्ह जिहाद’ विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

४ दिवसांत आरोपीचा शोध न लागल्यास श्रीरामपूर बंदची चेतावणी !

श्रीरामपूर (जिल्हा नगर) – येथील एका महाविद्यालयीन तरुणीला मुसलमान तरुणाने पळवून नेले आहे; परंतु पोलीस ठाण्यात याविषयी केवळ ‘मिसिंग’ची (हरवलेली) नोंद झालेली आहे. सदर प्रकार हा ‘लव्ह जिहाद’चा असल्याने आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांनी अनेकदा निवेदने दिली; परंतु ४० दिवस झाले, तरी अजूनही मुलगी सापडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण करून आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी १ सप्टेंबर या दिवशी श्रीरामपूर येथे ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’ आणि समस्त हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

१. या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. येत्या ४ दिवसांत आरोपीचा शोध न लागल्यास आणि आरोपीला अटक न झाल्यास शहरातील व्यापार्‍यांशी चर्चा करून श्रीरामपूर बंदचा निर्णय किंवा लोकशाही मार्गाने अन्य आंदोलन यांविषयी निर्णय घेतला जाईल, अशी चेतावणी ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’चे प्रमुख आणि माजी पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी दिली आहे.

मोर्चामध्ये सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कायकर्ते आणि धर्मप्रेमी

२. या वेळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, साहाय्यक पोलीस निरीक्षक बोर्से यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

न्याय मागणार्‍यांना नोटिसा दिल्या जाणे चुकीचे आहे ! – सूरज आगे, माजी पोलीस अधिकारी

माजी पोलीस अधिकारी सूरज आगे म्हणाले, ‘‘श्रीरामपूर शहरात लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. शहरात एका मुलीला पळवून नेले जाते, त्यांचे कुटुंबीय पोलिसांकडे निवेदन देऊन मागणी करतात आणि त्यांना न्याय मिळत नाही; म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो. असे केल्याने आम्हालाच उलट नोटिसा दिल्या जातात. मग लोकशाही मार्गानेही न्याय मागायचा नाही का ? अशा प्रकारे न्याय मागणार्‍यांना नोटिसा देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात कुणी कुणाला न्याय मिळवून देण्यासाठी उभे रहाणार नाही. हे लोकशाहीच्या आणि न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहे.’’

३. मोर्च्यानंतर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी श्रीरामपूर येथील पोलीस ठाण्याला भेट दिली. या वेळी शेखर म्हणाले, ‘‘आतापर्यंत ४ प्रकरणे समोर आली असून आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांचे अन्वेषण पोलीस कसून करत आहेत. शेवटच्या आरोपीपर्यंत पोचल्याविना पोलीस थांबणार नाहीत. नागरिकांनीही पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी या वेळी केले.

मोर्चाला संबोधित करतांना हिंदुत्वनिष्ठ

काय आहे प्रकरण ?

या भागात अल्पवयीन विद्यार्थीनींना शाळेतून पळवून नेऊन त्यांच्याशी बळजोरीने निकाह लावण्याच्या घटना घडत आहेत. या परिसरात २५ ते ३० जणांची टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आतापर्यंत १० हून अधिक मुलींचे अपहरण करून त्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. या मुलींचे धर्मांतर करून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात एका पोलीस अधिकार्‍यांनाही निलंबित केले आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणे, हे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक !
  • ‘लव्ह जिहाद’ची समस्या आतंकवादी आक्रमणापेक्षाही गंभीर बनत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शोधून शिक्षा होणे आवश्यक आहे !
  • हिंदु धर्माच्या मुळाशी उठलेल्या षड्यंत्राच्या लक्षावधी घटना घडूनही आज त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा येऊ शकलेला नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणावे !