धन्य ते गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) – शिष्य (सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ) !
साधकांना कृतीतून शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘२९.८.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची अद्वितीय क्षमता असणारे एकमेवाद्वितीय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !’ ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट प्रसिद्ध झाली. यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सप्तर्षींनी जसे माझ्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकल गाडगीळ आहेत, असे सांगितले आहे, तसे सूक्ष्मातील उपायांचे उत्तराधिकारी सद्गुरु डॉ. मुकल गाडगीळ आहेत’, असे सांगतील’, असे म्हटले आहे. हे वाचून मला पुढील प्रसंग आठवला.
४.३.२०१९ या दिवशी सकाळी एका हिंदुत्वनिष्ठाला आध्यात्मिक त्रास होत असल्याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मला कळवले. ‘यापूर्वी असे आध्यात्मिक स्तरावरील उपाय परात्पर गुरु पांडे महाराज यांना विचारत असे. बाबांनी (परात्पर गुरु पांडे महाराज यांनी) ३.३.२०१९ या दिवशी सायंकाळी देहत्याग केला. आता आध्यात्मिक स्तरावील उपाय कुणाला विचारावेत ?’, असे सद्गुरु पिंगळेकाकांनी मला विचारले.
मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी निमिषभर (पापणी लवण्यास लागणारा वेळ) डोळे मिटले आणि मला म्हणाले, ‘पू. डॉ. गाडगीळकाका (आताचे सद्गुरु गाडगीळकाका) यांना विचार. पू. गाडगीळकाका काय नामजपादि उपाय सांगतात, ते शिकण्यासाठी मला कळव.’’ मी पू. डॉ. गाडगीळकाकांना हा निरोप देऊन त्यांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारून त्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना माहितीसाठी कळवले. तेव्हा गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) म्हणाले, ‘जसे परात्पर गुरु पांडे महाराज, तसे आता आपले गाडगीळ महाराज !’
या प्रसंगातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याची प्रचीती, तसेच त्यांची ‘हें मजचिस्तव जाहलें । परि म्यां नाहीं केलें ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ८१) म्हणजे ‘हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही’ ही वृत्ती (कर्तेपणा इतरांना अर्पण करण्याचा मनोभाव) एकवार पुन्हा अनुभवता आली. याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०२२)