गणेशोत्सव कि ‘मार्केटिंग इव्हेंट’ ?
लोकमान्य टिळक यांनी लोकजागृतीच्या दृष्टीने श्री गणेशचतुर्थीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले; मात्र अपवादात्मक काही गणेशोत्सव मंडळे सोडली, तर या उत्सवामागचा मूळ हेतूच बाजूला पडून या उत्सवाला ‘मार्केटिंग इव्हेंट’चे स्वरूप आल्याचे दिसत आहे. कोरोना महामारीची २ वर्षे उलटल्यानंतर उत्सव सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे दिसत आहे; पण अनेक ठिकाणी या उत्साहाला धांगडधिंग्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहिल्यावर खेद वाटतो.
यंदाही मुंबईत अनेक ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांनी मोठ्या उड्डाणपुलापर्यंत पोचतील, एवढ्या मोठ्या गणेशमूर्ती आणल्या. या मूर्तीही वेगवेगळ्या आकारातील होत्या. वस्तूतः गणेशमूर्ती ही पाटावर बसलेली असायला हवी; मात्र वेगवेगळ्या स्वरूपाच्या आणि मोठ्या उंचीच्या गणेशमूर्ती आणून आपल्याकडून श्री गणेशाची आराधना नाही, तर अवमानच होत आहे, हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. एका गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशमूर्तीवरील कोट्यवधी रुपयांच्या अलंकारांचा विमा उतरवल्याचेही पहायला मिळाले. यावरून उत्सवामध्ये खरंच भक्तीभाव शिल्लक राहिला आहे का ?, असा प्रश्न पडतो. अनेक गणेशोत्सव मंडळे मोठ्या ‘सेलिब्रिटीज्’ना त्यांच्या मंडळात बोलावून त्यांच्या मंडळाची प्रसिद्धी करायचा प्रयत्न करतात. या मंडळांना भाविक मोठ्या रकमेच्या देणग्या देतात; पण या देणग्यांचा विधायक कार्यासाठी किंवा धर्मकार्यासाठी उपयोग झाल्याचे अभावानेच पहायला मिळते. यंदा मंडळांच्या श्री गणेशमूर्ती आणण्यासाठी सहस्रो लोक एकत्र जमले होते. त्यामध्ये अनेक महिलाही होत्या. त्यातील एका मंडळाच्या मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरीही झाली. श्री गणेशमूर्ती आणण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने मिरवणूक काढून जाण्याची प्रथा नाही; पण चुकीच्या दृष्टीकोनांमुळे विसर्जन मिरवणुकांप्रमाणे श्री गणेशाच्या ‘आगमन मिरवणुकां’चीही प्रथा चालू होईल कि काय, असे वाटते. सार्वजनिक उत्सव मंडळांनी ठरवले, तर अनेकानेक विधायक कृती करता येऊ शकतात; पण त्यासाठी योग्य दिशा आणि दृष्टीकोन घेऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सव म्हणजे ‘मार्केटिंग इव्हेंट’ किंवा बाजार नाही आणि श्री गणेशमूर्ती म्हणजे शोभेची वस्तू नाही, याचे भान सगळ्यांनी ठेवायला हवे.
– श्रीमती स्मिता नवलकर, पनवेल