काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे हिंदुत्वाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’चा भाग आहे ?
डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व म्हणजे हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन‘हिंदु’ आणि ‘हिंदुत्व’ अशी स्वतंत्र अन् अस्तित्वात नसलेली संज्ञा जाहीरपणे मांडून काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी समस्त धर्मअभ्यासकांना धक्का(?)च दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदुप्रेमींची मने दुखावलीच, तसेच हिंदु धर्मावर आघात करण्यात समाधान मानणारे काँग्रेस नेते आणि तिचे नेतृत्व अजूनही खरे हिंदुत्व जाणून घ्यायला सिद्ध नाहीत, ही लोकांची भावना पुन्हा दृढ झाली. |
१. राहुल गांधी यांचे वक्तव्य हा ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’चा ‘अजेंडा’ (कार्यसूची) !
‘स्वत:ला हिंदुत्व मान्य असल्याचे म्हणायचे आणि त्याच वेळी अतिरेकी बुद्धीवादही करायचा, हा शुद्ध दुटप्पीपणा आहे’, अशी टीका यामुळे त्यांच्यावर होऊ लागली आहे. ाहुल गांधी हे डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी उचलून धरलेला ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’चा ‘अजेंडा’ (लक्ष्यित कार्यप्रणाली) राबवत आहेत का ? अशीही शंका त्यांच्या या वक्तव्यांमुळे व्यक्त केली जात आहे.
बुद्धीवाद करण्याची राहुल यांची ही नसती उठाठेव काँग्रेस पक्षाला हानीकारक ठरू शकते, अशी चिंता काही काँग्रेसप्रेमींना सतावत आहे. त्याच वेळी राहुल गांधी यांनी रुद्राक्ष माळ परिधान करण्यास कसा विरोध केला, याचाही व्हिडिओ ‘व्हायरल’ (सामाजिक माध्यमातून प्रसारित) झाला आहे. तथापि राहुल यांच्या भगिनी स्वत: प्रियांका वाड्रा यांनी राहुल यांच्या हिंदुत्वाविषयी केलेल्या वक्तव्यांचे जोरकसपणे समर्थन केले.
२. राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याची ‘री’ ओढणे चालूच !
राहुल यांनी हिंदु आणि हिंदुत्व असा भेद मांडल्याने देशभरात वादळ उठले. राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याची ‘री’ ओढून एक मोठा वर्ग सामाजिक माध्यमावरून ‘हिंदु आणि हिंदुत्ववादी’ हा अस्तित्वात नसलेला भेद मांडत आहेत, तसेच चुकीच्या पद्धतीने धर्मचिकित्सा करत धर्माची निंदा-नालस्ती करण्यात धन्यता मानत आहेत. एकार्थाने ते अज्ञानाचाच आनंद लुटत आहेत, असे हिंदुत्व जाणणार्यांचे मत आहे.
यात विशेष असे आहे की, ‘होऊन गेलेले भारतीय संत हे खरे हिंदु’ आणि ‘त्या संतांना ज्यांनी सतावले ते हिंदुत्ववादी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे खरे हिंदु’ आणि ‘ज्यांनी त्यांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, ते हिंदुत्ववादी’, असे अनेक उल्लेख जोडून अफाट आणि अचाट बुद्धीच्या राहुल समर्थकांनी ‘हिंदु आणि हिंदुत्ववादी’ यांतील कथित भेद मांडणे चालू ठेवले आहे.
३. ब्रिटीशकालीन कुनीतीचा अवलंब !
यावर हिंदु जाणकारांचे म्हणणे आहे की, खरेतर ‘हिंदुत्वनिष्ठ’ आणि ‘हिंदुद्रोही’ अशी फोड करता येऊ शकते. हिंदु संस्कृतीत सहिष्णुता, मानवता, विश्वबंधुता आणि ईश्वरनिष्ठ धर्माचरण या समवेतच राष्ट्राभिमानही शिकवला जातो. त्याच्याशी जो जो प्रामाणिक नाही, तो ‘हिंदुद्रोही’ म्हटला जाऊ शकतो. हिंदु धर्माचे महत्त्व सांगायचा जो कुणी प्रयत्न करील, त्याला ‘धर्मवादी’ अथवा ‘हिंदुत्ववादी’ संबोधून झोडपायचे, ही ब्रिटीशकालीन कुनीती आहे.
४. स्वधर्माची नालस्ती करणार्या तरुणांची संख्या हिंदु धर्मात अधिक !
या प्रकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, राहुल गांधी यांचे म्हणणे ग्राह्य मानून हिंदुत्वाची चुकीच्या दृष्टीकोनातून मांडणी करायला मोठा हातभार लावणार्या ‘सोशल’ (सामाजिक) टोळ्यांमधील बहुसंख्य तरुण हे जन्माने हिंदूच आहेत, ही गोष्ट धर्मप्रेमी संघटनांना चिंतन करायला लावणारी आहे. इतक्या संख्येने जन्माने हिंदु असलेले तरुण स्वधर्माची नालस्ती करण्यात धन्यता मानतात, हे चित्र काय दर्शवते ? असा प्रश्न उपस्थित होतो. हिंदु धर्मातील तरुणांना अजूनही स्वधर्माचा अभिमान, स्वधर्माचे ज्ञान आणि स्वधर्माचे आचरण अन् त्याचे महत्त्व शिकवणारी प्रभावी व्यवस्था भारतात नाही, याकडे निर्देश केला जात आहे.
५. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षणप्रणालीचे फलित म्हणजे स्वयंघोषित अभ्यासकांना आलेले उधाण !
स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण कालावधीत भारतात जी शिक्षणप्रणाली राबवली गेली, त्यातून कोणत्या विचारसरणीचे नागरिक निपजले, याचा हा जिवंत आरसाच म्हणावा. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, भारतात संख्येने बहुल असलेल्या हिंदूंचे मर्म त्यांच्या धर्म शिकवणीत होते आणि ब्रिटीश हे जाणून होते; म्हणून ब्रिटीश राजवट असतांनाच हिंदु संस्कृती रुजवणारे धर्मशिक्षण रहित केले गेले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस राजवटीत तेच सूत्र मागील पानावरून पुढे चालू राहिले. परिणामी आज असे दिसते की, मूळ अभ्यास नसतांनाही हिंदुत्वाची चिरफाड करणारे स्वयंघोषित अभ्यासक आज गल्लीबोळात अनेक जण मिळतात. हिंदूंच्या संदर्भांची मोडतोड केलेले आणि बुद्धीभेद करणारे ऐतिहासिक प्रसंग प्रसारित करण्याला सध्या उधाण आलेले दिसते, ते यामुळेच !
हिंदुप्रेमींना यावरून जाणवते की, मंदिरांत अर्पण केलेले धन धर्मशिक्षण देण्याच्या कामात वापरले जाणार नाही, याची काळजी कायदे बनवणार्यांनी कायमच घेतली; हेही वेळोवेळी दिसून येते.
६. जागतिक हिंदुत्वाचे तुकडे पाडून ते नष्ट करण्याचे षड्यंत्र ओळखणे आवश्यक !
हिंदु धर्माचे आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, योग आणि तत्सम विविध हिंदु संकल्पना जगात स्वीकारल्या जात आहेत अन् त्यातून ‘वैश्विक हिंदुत्व’ आकाराला आले आहे. त्याला हाणून पाडण्यासाठी समस्त डाव्या संघटनांनी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ राबवायला घेतले आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या या म्हणण्याला सप्टेंबर २०२१ मध्ये विदेशात पार पडलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचा आधार आहे. ‘हिंदु आणि हिंदुत्व’ अशी निरर्थक फोड करणार्यांकडे या अंगाने पाहिल्यास सत्य कळू शकते.
‘डिसमेंटलिंग’ याचा मराठीत अर्थ होतो, तुकडे पाडणे किंवा नष्ट करणे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व म्हणजे जागतिक हिंदुत्वाचे तुकडे पाडणे अथवा ते नष्ट करणे.’ याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे, ‘हिंदु संस्कृतीची महानता जगाच्या स्तरावर स्वीकारली जात असतांना इकडे भारतात मात्र धर्मावरून गोंधळ माजवायचा. आधीच जातीपातीत आणि विविध पंथांमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदु धर्मियांना बुद्धीभेदाचे अस्त्र वापरून आणखी भ्रमित करायचे आणि आपापसांत लढण्यास भाग पाडायचे. त्यातच बुद्धीवादाने पछाडलेल्या हिंदूंच्याच हातून हिंदु धर्मियांची यथेच्छ चिरफाड करवून घ्यायची’, असे षड्यंत्र या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’च्या मागे असू शकते. मग राहुल गांधी यांनी हिंदुत्वाविषयी चुकीची मांडणी करणे आणि वादग्रस्त विधान करणे, हे ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’चा एक भाग असावा का ? अशी शंका हिंदुप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
ही शंका निराधार मानली, तरी त्यांनी (राहुल गांधी यांनी) हिंदुत्वाविषयी चुकीची संदर्भहीन मते मांडली आणि इकडे लगेच ते उचलून धरण्यासाठी प्रत्येक राज्यातून काही टोळ्या पुढे सरसावल्या. हा घटनाक्रम ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’चा भाग वाटावा असाच आहे. हे असेच चालू राहिले, तर काँग्रेस पक्षाची मतपेढी वाढेल कि घटेल ? हे मात्र उत्तरप्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निकालातूनच समजू शकेल.
– श्री. योगेंद्र जोशी, वरिष्ठ पत्रकार, नंदुरबार.