श्री गणेश मूर्तीदान नकोच !
पश्चिम महाराष्ट्रात विशेषकरून इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे गणेशभक्त अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना या ‘श्री गणेशमूर्ती दान नको’, तसेच ‘विसर्जनास प्रशासनाने आडकाठी आणू नये’, या मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. इचलकरंजी येथील आमदार प्रकाश आवाडे यांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून ‘प्रशासनाने आडकाठी आणल्यास वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून गणेशभक्तांचा मार्ग मोकळा करू’, असे सांगितले आहे. हिंदु जनजागृती समितीनेही पत्रकार परिषद घेऊन प्रदूषण मंडळ कशा प्रकारे धार्मिक पक्षपात करते ? आणि पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारखान्यांसह अन्य घटक कसे कारणीभूत आहेत ?, हे सप्रमाण दाखवून दिले. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘प्रदूषण नियंत्रण मंडळाला केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच कशी जाग येते ?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
वास्तविक वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन, हा समस्त गणेशभक्तांचा धार्मिक अधिकार आहे. हिंदु धर्मशास्त्राचा त्यास आधार आहे, हे महत्त्वाचे ! दुसरीकडे शासनाचे कोणतेही अधिकृत परिपत्रक नसतांना स्थानिक प्रशासन मात्र मूर्तीदान, तसेच कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित करण्याच्या त्याच्या हिंदु धर्मशास्त्रविसंगत भूमिकेवर ठाम आहे. गणेशभक्तांच्या धार्मिक भावना धुडकावून लावत प्रदूषणाचे कथित कारण पुढे करून कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेड्स’ लावण्यात आली आहेत. या माध्यमातून भाविक विसर्जनासाठी येऊच नयेत, असे प्रयत्न चालू आहेत. या सगळ्यात गणेशभक्तांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या न्याय्य भूमिकेवर ठाम रहाणे सर्वथा योग्य आहे.
याउलट कोकणातील गणेशोत्सव पाहिल्यास सामान्य भाविक श्री गणेशमूर्ती पाण्यातच विसर्जन करतो, तसेच तेथील प्रशासनही गणेशभक्तांना विसर्जन करण्यासाठी विरोध करत नाही. कोकणात तर जवळपास प्रत्येक घरी श्री गणेशमूर्ती असते. ‘कोकणात श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही आणि अन्यत्र होते’, असे कसे ? कोकणात प्रशासन गणेशभक्तांना सहकार्य करते; याउलट पश्चिम महाराष्ट्रात कथित पर्यावरणवाद्यांच्या, तसेच पुरो(अधो)गाम्यांच्या दबावाला बळी पडून गणेशभक्तांना आडकाठी करण्यात येते. हे अन्यायकारक आहे. शासनाने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या संदर्भातील अडचण दूर करावी. तीच श्री गणेशाची खरी आराधना ठरेल !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर