साम्यवाद्यांचे वर्तन स्वातंत्र्य लढ्याला कधीच पोषक नव्हते ! – माधव भांडारी, भाजप
सांगली – ताश्कंदमध्ये स्थापन झालेल्या साम्यवाद्यांचे वर्तन स्वातंत्र्यलढ्याला कधीच पोषक नव्हते. इंग्रजांशी हातमिळवणी करून भारतविरोधी कारवाया करण्यास पुढाकार घेणार्या डाव्यांच्या धोरणात अद्यापही काहीही पालट झालेला नाही. येथील साम्यवादी हे सोविएट रशियाच्या चेतावणीनुसारच कार्यरत असतात, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्हा नगरवाचनालय आणि ‘बाळासाहेब गलगले फाऊंडेशन’च्या वतीने माधव भांडारीलिखित ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या ग्रंथाचे प्रकाशन बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सुहास कुलकर्णी, श्रीकांत जोशी उपस्थित होते.
माधव भांडारी पुढे म्हणाले, ‘‘वर्ष १९२० ते १९२५ ही ५ वर्षे देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहेत. याच कालावधीत ‘कम्युनिस्ट पक्ष’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्थापना झाली. डाव्यांनी केलेल्या भारतविरोधी कारवाईचे सर्व पुरावे सध्या उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यलढा मोडून काढण्याचा करार डाव्यांनी इंग्रजांसमवेत केला होता. इंग्रजांकडून राजकीय आणि आर्थिक लाभ घेण्यात डावे पुढे होते. इंग्रजांनी डाव्यांवर बंदी घातली असली, तरी इंग्रजांनीच काही मासातच ही बंदी उठवली होती, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आजदेखील डाव्यांची ताकद ज्या राज्यात आहे तेथे कायम अशांतता निर्माण झालेली आपण पहातो.
पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा येथे कित्येक वर्षे डाव्यांचे राज्य होते; परंतु उद्योग-व्यवसाय, शेतीमध्ये त्या राज्यांची पिछेहाट झाल्याचे दिसते. तेथे गरिबी आणि विषमतेमध्ये वाढ झाल्याचे आपण पहातो. मुसलमानांची सर्वात वाईट परिस्थिती याच राज्यात असलेली आपणास दिसते.