सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधनेविषयी सांगितलेली अनमोल सूत्रे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

अ. आपत्काळात प्रार्थना, वेळ आणि आर्तभाव यांना अधिक महत्त्व असणार आहे ! : एका जिल्ह्यातील एक साधक रुग्णाईत असल्याने त्याला अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तो साधक बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे जिल्ह्यातील उत्तरदायी साधकाने सद्गुरु काकांना नामजपादी उपाय विचारले. सद्गुरु काकांनी नामजप शोधून देण्यासह तो किती घंटे करणे आवश्यक आहे, हे त्याला सांगितले. त्या वेळी त्याने सद्गुरु काकांना सांगितले, ‘‘ते रुग्णाईत साधक नामजप करू शकत नाहीत.’’ तेव्हा सद्गुरु काकांनी सांगितले, ‘‘रुग्णाईत साधकाच्या कानामध्ये त्याने करावयाची प्रार्थना आणि नामजप सांगा.’’

आ. ‘संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना केल्यावर आध्यात्मिक त्रास अल्प होण्यास साहाय्य होते’, असे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगणे : एकदा सद्गुरु काका मला म्हणाले, ‘‘मी एखाद्या साधकाला ४ घंटे नामजप करण्यास सांगतो. त्या वेळी साधक ‘तो नामजप आणि त्यासाठीची प्रार्थना किती आर्ततेने करतो’, याला महत्त्व आहे. एखाद्या साधकाला  आध्यात्मिक त्रास होत असतांना त्याने १ घंटा नामजपादी उपाय केल्यावर तो थोडेफार न्यून होतो. मी साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना संबंधित देवतांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करतो आणि साधकांसाठी नामजपादी उपाय केल्यावर १० ते १५ मिनिटांमध्ये साधकांचा त्रास न्यून होण्यास आरंभ होतो. साधकांनी आर्तभावाने प्रार्थना केली, तरी त्यांचे ४ घंट्यांचे फळ देव एका प्रार्थनेनेही देईल.’’ त्यामुळे मला ‘आपत्काळात प्रार्थना, वेळ आणि आर्तभाव यांना अधिक महत्त्व असते’, हे लक्षात आले.

श्री. भूषण कुलकर्णी

इ. स्वतःच्या चुका न्यून होण्यासाठी शरणागती वाढवण्याविषयी सांगणे : गेल्या २ – ३ मासांमध्ये माझ्याकडून आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधील साधकांकडून प्रतिदिन सेवा करतांना अनेक अक्षम्य, गंभीर आणि संकलनाच्या पुष्कळ चुका झाल्या. माझ्याकडून झालेल्या काही चुका मी सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्या. त्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आपल्याला साधना म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी घडवायचे असते. त्यामुळे त्यांना आपण नेहमी शरणागतभावाने प्रयत्न करणे आवश्यक असते. काही वेळा आपली शरणागती न्यून पडते आणि अहं वाढू लागतो. त्या वेळी ते आपल्यातील कर्तेपणा नष्ट करण्यासाठी प्रयत्न वाढवण्यासाठी संधी देतात अन् आपली शरणागती वाढवतात. त्यांना अपेक्षित असे शरणागतीचे प्रयत्न होईपर्यंत ते आपल्याकडून प्रयत्न करून घेतात.

ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित सेवा म्हणजे काय ? : एकदा सद्गुरु काकांना शिकायला मिळालेले सूत्र सांगतांना ते मला म्हणाले, ‘‘आपण सेवा करण्यापूर्वी प्रार्थना करतो, ‘परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा माझ्याकडून होऊ दे.’ प्रत्यक्षात आपण तसे करतो का ? समजा आपल्याला ५-६ ओळी व्याकरण आणि शुद्धलेखन यांच्या दृष्टीने परिपूर्ण करायचे म्हटले, तर ‘प्रार्थनेप्रमाणे आपण त्यात एकही चूक होऊ देता कामा नये’, असे अभिप्रेत आहे. असे असले, तरी आपण त्या ६ ओळी वाचत असतांना १ – २ शब्दांविषयीच्या चुका किंवा त्यांचे अर्थ कंसात देणे अपेक्षित असल्याचे आपल्याला लक्षात येतात; पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्या ६ ओळी वाचून अंतिम करतो. यातून ‘आपण प्रार्थनेप्रमाणे परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा केली का ?’, याचे उत्तर ‘नाही’ असेच असेल. प्रार्थनेप्रमाणे सेवा करायची, तर ती ६ वाक्ये परिपूर्ण आणि भावासहित पडताळायला हवीत.

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.