समंजस, धर्माचरणी आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून समाधानी जीवन जगलेल्या नेरूळ, नवी मुंबई येथील कै. श्रीमती सुनंदा कृष्णाजी कदम (वय ८० वर्षे) !
भाद्रपद शुक्ल पंचमी (१.९.२०२२) या दिवशी नेरूळ, नवी मुंबई येथील रहिवासी कै. श्रीमती सुनंदा कृष्णाजी कदम (वय ८० वर्षे) यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांची मुलगी सौ. जोत्स्ना जगताप यांना त्यांच्या आईविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. कष्टाळू
‘माझी आई कै. श्रीमती सुनंदा कृष्णाजी कदम ही लहानपणापासून कष्टाळू होती. गावी असतांना तिने शेतीची पुष्कळ कामे केली होती.
२. अध्यात्माची आवड
अ. बाबा श्रावणात गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांचे पारायण करायचे. ते ती नियमित ऐकायची. तिला वाचता येत नव्हते; पण तिची स्मरणशक्ती चांगली होती. बाबा स्तोत्रे म्हणत असतांना ती ऐकून तिची स्तोत्रे तोंडपाठ झाली होती.
आ. तिची आमची कुलदेवी आई भवानीवर पुष्कळ श्रद्धा होती. ‘कुलदेवी आमच्या पाठीशी आहे’, अशी तिची श्रद्धा होती. काहीही संकट आले, तरी ती लगेच कुलदेवतेला हाक मारायची.
३. वडिलांविषयी असलेला आदरभाव
बाबांनी आईला जे सांगितले असेल, ते आई लगेच करायची. तिने कधी त्यांच्याविषयी गार्हाणे केले नाही किंवा त्यांचे पटले नाही, असेही कधी झाले नाही. आई आणि बाबा यांच्यामध्ये कधीच वाद झाला नाही. बाबांनी तिला धर्माचरणाविषयी जे सांगितले होते, त्याचे ते गेल्यानंतरही तिने पालन केले. ‘त्यांना पुढे जाता येऊ दे. चांगली गती मिळू दे’, अशी तिची इच्छा होती.
४. सनातनच्या कार्याविषयी असलेली आस्था !
मी तिला सनातन संस्थेच्या कार्याविषयी सांगायचे. तेव्हा ती मला म्हणायची, ‘‘आपलेही धर्मकार्यासाठी अर्पण झाले पाहिजे.’’ साधक गुरुपौर्णिमेसाठी अर्पण घ्यायला घरी आल्यावर ती त्यांना अर्पण द्यायची.
५. देवावरील अपार श्रद्धेमुळेच आईला सहजतेने मृत्यू येणे
ती मला म्हणायची, ‘‘तुझ्या गुरूंना सांग, मला चालता-बोलता घेऊन चला.’’ माझ्या मधल्या वहिनींच्या भावाकडे गणपतीची प्रतिष्ठापना करतात. आई त्यांच्या घरी गणपतीचे दर्शन घ्यायला गेली होती. तिथे जेवून झाल्यावर तिने वहिनींच्या आईशी गप्पा मारल्या आणि नंतर रात्री अडीच वाजता तिचे निधन झाले. देवावरील अपार श्रद्धेमुळेच तिला खरोखरच चालता-बोलता मरण आले.
६. आईला पूर्वसूचना मिळणे
ती आधीच मला म्हणाली होती, ‘‘तू माझ्या शेवटच्या क्षणी येऊ शकणार नाहीस.’’ त्याप्रमाणे मला खरेच जाता आले नाही. त्याच दिवशी माझ्या सासर्यांचे निधन झाल्याने मी आईला बघायला जाऊ शकले नाही.
७. कृतज्ञता
आईने तिच्या कृतीतून आम्हाला ‘धर्मानुसार आचरण करणे, देवावर दृढ श्रद्धा ठेवणे, तसेच प्रत्येक कृती सेवाभावाने करणे’, हे सर्व शिकवले. यासाठी मी तिच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. ज्योत्स्ना जगताप, फोंडा गोवा. (१.८.२०२२)