सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी उपायांसाठी दिलेला नामजप आणि त्यांचा संकल्प यांचे डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे यांनी अनुभवलेले सामर्थ्य !
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ५९ वा वाढदिवस २८.८.२०२२ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी झाला. त्या निमित्ताने श्री. भूषण कुलकर्णी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भातील लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याकडूनशिकायला मिळालेली सूत्रे आदी आपण २९ आणि ३० ऑगस्ट या दिवशी पाहिली. आज सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी उपायांसाठी दिलेल्या नामजपाच्या सामर्थ्याची साधिकेला आलेली प्रचीती येथे दिली आहे.
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/608743.html |
१. पाय घसरून पडल्यावर डाव्या गुडघ्याच्या वाटीचा पूर्वी अस्थीभंग झालेल्या ठिकाणी पुन्हा अस्थीभंग होणे
‘३०.४.२०२२ या दिवशी मी पाय घसरून पडले; म्हणून मी अस्थीरोगतज्ञांकडे गेले. त्यांनी माझ्या पायाची क्ष-किरण (एक्स-रे) पडताळणी केली. ते मला म्हणाले, ‘‘डाव्या गुडघ्याच्या वाटीचा अस्थीभंग झाला आहे. १० दिवसांनी हाड जुळले नाही, तर शस्त्रकर्म करावे लागेल.’’ यापूर्वी एप्रिल २०२१ मध्येही माझ्या डाव्या गुडघ्याचा त्याच ठिकाणी अस्थीभंग झाला होता. आता माझे वय ५४ वर्षे आहे. या वयामधे परत त्याच ठिकाणी अस्थीभंग झाल्यावर वैद्यकीयदृष्टीने हाड जुळण्याच्या प्रक्रियेला पुष्कळ कालावधी लागू शकतो, तसेच ‘हाड व्यवस्थित जुळेल’, असे निश्चितपणे सांगता येत नाही.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना अस्थीभंग झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी नामजपाचे उपाय सांगणे
मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘माझ्या गुडघ्याच्या वाटीचा अस्थीभंग झाला आहे.’’ आरंभी त्यांनी मला ‘हाड जुळण्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी आणि नंतर हाड लवकर जुळून यावे’, यासाठी नामजप दिला. सद्गुरु काकांनी सांगितल्याप्रमाणे मी नियमित नामजपादी उपाय केले.
३. सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेले नामजप केल्यावर हाड जुळल्याचे लक्षात येणे आणि मंगळुरू ते पनवेल प्रवास करता येणे
१० दिवसांनी क्ष-किरण पडताळणी केल्यावर अस्थीरोगतज्ञ मला म्हणाले, ‘‘हाड जुळत आहे. त्यामुळे शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नाही.’’ ४ आठवड्यांनी मी पुन्हा अस्थीरोगतज्ञांना भेटून क्ष-किरण पडताळणी केली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘हाड व्यवस्थित जुळले आहे आणि तुम्ही नेहमीप्रमाणे चालू शकता.’’ १५ दिवसांनी मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मंगळुरू ते पनवेल असा प्रवासही करू शकले.
४. मागील वर्षी आणि या वर्षी डाव्या गुडघ्याचे हाड मोडल्यावर बरे होण्याच्या प्रक्रियेत जाणवलेला भेद
टीप – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा हा लेख ११.४.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला होता.
५. सद्गुरु गाडगीळकाका यांनी दिलेल्या नामजपामुळेच हाड जुळण्याची प्रक्रिया लवकर होणे आणि त्याचा मानसिक अन् आध्यात्मिक स्तरावरही लाभ होणे
सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेल्या नामजपामुळेच हाड जुळण्याची प्रक्रिया लवकर झाली. या नामजपाचा मला केवळ शारीरिक स्तरावरच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही लाभ झाला. मागील वर्षी काही मासांनंतरही ‘मी प्रवास करू शकेन कि नाही ?’, असे मला वाटत होते. ‘मी लवकर बरी होईन’, याची शाश्वती नव्हती आणि मला आत्मविश्वासही वाटत नव्हता. माझ्या पायातील शक्ती अल्प झाल्याने माझी चालण्याची गती न्यून झाली होती. मला पाय ओढत चालायला लागत असल्यामुळे माझ्या मनामधे काही प्रमाणात न्यूनगंडही निर्माण झाला होता.
६. नामजपादी उपाय केल्यावर मन सकारात्मक आणि भावाच्या स्थितीत रहाणे
या वेळी अस्थीभंग झालेल्या दिवसापासूनच मन सकारात्मक होते. त्यानंतरच्या कालावधीमध्येही मन सकारात्मक आणि भावाच्या स्थितीमधे होते. या प्रसंगानंतर मंगळुरू ते पनवेल एवढा लांबचा प्रवास करतांना माझ्या मनावर कोणताही ताण नव्हता. मला ‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत’, अशी जाणीव होती.
७. सद्गुरु गाडगीळकाकांनी एखाद्या आजारावर नामजपाचे उपाय सांगितल्यावर आजार बरा होण्याच्या प्रक्रियेविषयी देवाने सुचवलेले विचार !
सद्गुरु गाडगीळकाका एखाद्या आजारावर नामजपाचे उपाय सांगतात. तेव्हा ‘त्या नामजपामुळे आजार बरा होण्याची प्रक्रिया कशी असावी ?’, असे मी देवाला विचारले. तेव्हा त्याने मला पुढील सूत्रे सांगितली.
अ. जेव्हा एखादा आजार होतो, तेव्हा त्या अवयवामध्ये काही न्यूनता निर्माण होते. हे जसे शारीरिक स्तरावर होते, तसेच त्या अवयवाच्या ठिकाणी वाईट शक्तीही स्थान निर्माण करतात.
आ. सद्गुरु गाडगीळकाकांनी एखाद्या आजारावर नामजप सांगितल्यावर त्यांनी ज्या देवतेचा नामजप सांगितलेला असतो, त्या देवतेचे तत्त्व लगेच कार्यरत होते. देवतेच्या चैतन्यामुळे वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या अवयवाच्या स्थानावर परिणाम होऊन आजार बरा होण्याच्या प्रक्रियेमधील अडथळे दूर होऊन तो शीघ्र गतीने बरा होतो.
इ. सद्गुरु गाडगीळकाका नामजप सांगतात, त्या वेळी त्यांचा संकल्पही कार्यरत होतो.
ई. सद्गुरु गाडगीळकाकांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे साधकाला मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. ‘एखादा रोग बरा होणे’, हे रुग्णाचे मनोबल आणि इच्छाशक्ती यांवरही काही प्रमाणात अवलंबून असते. सद्गुरु गाडगीळकाका यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे साधकाचे मनोबल वाढते आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे रुग्णाच्या मनाच्या स्थितीतही पालट होऊन त्याचा उत्साह वाढतो.
८. आध्यात्मिक बळाचे महत्त्व जाणवणे
प.पू. गुरुदेवांनी सांगितले आहे, ‘आपत्काळामधे वैद्यकीय उपचार मिळणार नाहीत. तेव्हा केवळ नामजपादी उपायच संजीवनीप्रमाणे कार्य करतील.’ या आजारपणामधे मी त्याची प्रचीती घेतली. ‘विज्ञानाला मर्यादा आहेत आणि नामजपाचे म्हणजे आध्यात्मिक बळाचे महत्त्व किती आहे ? त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ होतो ?, तसेच विज्ञानाच्या तुलनेत आध्यात्मिक सामर्थ्य किती श्रेष्ठ आहे ?’, हे मला या प्रसंगातून शिकायला मिळाले.
हे सर्व केवळ गुरुकृपा आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी दिलेल्या नामजपामुळे झाले. याविषयी मी प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– केवळ गुरुदेवांचीच,
सौ. मधुवंती पिंगळे, मंगळुरू सेवाकेंद्र, मंगळुरू, कर्नाटक. (११.७.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |