अन्य गणेश मंडळांना विसर्जनासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्त्याचा वापर करण्यावर असलेली बंधने अवैध ! – बढाई समाज ट्रस्ट
पुणे – विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाची ५ गणेश मंडळे गेल्यानंतरच अन्य मंडळांनी मार्गस्थ व्हावे, हा रूढी-परंपरा आणि प्रथेचा भाग, म्हणजे कायदा नाही. त्यामुळे अन्य गणेश मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने अवैध आणि संविधानातील कलम १९ नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी आहेत, असा आरोप ‘बढाई समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अधिवक्ता असीम सरोदे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या एका याचिकेच्या माध्यमातून केला. मानाची गणेश मंडळे मिरवणूक पूर्ण करायला फार वेळ लावतात. त्यांच्या मागून पुढे जाणार्या लहान गणेश मंडळांवर पोलीस गुन्हे नोंद करतात, अशीही तक्रार बढाई यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे. या आक्षेपाला अनेक गणेश मंडळांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार या ५ मंडळांना प्रथम मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे ? असा प्रश्न संजय बालगुडे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस आयुक्त कार्यालयाला विचारला होता. त्यावर पोलिसांनी त्यांना ‘याविषयी कोणताही लेखी कायदा किंवा नियम नाही’, असे कळवले. याचाही उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.