पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची ५ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा नोंद
पुणे – बांधकाम करारानुसार ठरल्याप्रमाणे ५ कोटी ३५ लाख रुपये, तर हातउसने घेतलेले ५२ लाख रुपये न देणे, बांधकाम प्रकल्पातील काही सदनिकांची दस्त नोंदणी करून परस्पर विक्री करणे, तसेच प्रकल्पस्थळी गुंड पाठवून बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न करणे, यांप्रकरणी माजी नगरसेवक फारूख यासीन सय्यद इनामदार, अफान इनामदार आणि अमितकुमार सिन्हा यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक राहुल गोयल यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
फारुख इनामदार यांच्या मालकीची भूमी विकसनासाठी गोयल यांना दिली होती. आरोपींनी गोयल यांना विकास हस्तांतरण हक्क (टी.डी.आर्.) विकत घेऊन न दिल्यामुळे बांधकामास विलंब होऊन आर्थिक हानी झाली. गोयल यांनी पुणे महानगरपालिकेकडे वाढीव चटई क्षेत्र खरेदीसाठी अर्ज केला होता. अर्ज संमत झाल्यानंतर आरोपींनी महानगरपालिकेत जाऊन दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत घेतली. गोयल यांच्या कामात अडथळा निर्माण करून त्यांची फसवणूक केली.