सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची निर्मिती होऊ नये यासाठी दक्षता घ्या !
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक
सोलापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यात अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांची निर्मिती होऊ नये यासाठी कृषीसह अन्य विभागांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत सातपुते बोलत होत्या.
या वेळी पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले की, जिल्ह्यात खसखस आणि गांजा या वनस्पतींची लागवड होऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. जिल्ह्यामध्ये गांजाची लागवड होत आहे, ती रोखणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या कृषी साहाय्यकाने पीक नोंदीची माहिती घेतांना काही आढळल्यास पोलीस विभागाला कळवावे.