प्रसाद सिद्ध करून वाटप करणार्या गणेशोत्सव मंडळांना नोंदणी घेणे आवश्यक ! – अन्न आणि औषध प्रशासन
सांगली – गणेशोत्सव कालावधीत गणेशोत्सव मंडळांनी प्रसाद सिद्ध करतांना आणि वाटप करतांना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. प्रसाद सिद्ध करून वाटप करणार्या गणेशोत्सव मंडळांना नोंदणी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील प्रसाद सुरक्षित असेल, याकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे लक्ष असणार आहे.
ग्राहकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्यासाठी अन्न व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी ! – अन्न आणि औषध प्रशासन
सांगली – ग्राहकांना गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि नाताळ या सणासुदीच्या काळात सुरक्षित, तसेच गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न व्यावसायिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासन, सांगली कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. अन्न व्यावसायिकांनी मिठाईच्या ‘ट्रे’वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा. कच्चे अन्नपदार्थ जसे दूध, खवा, खाद्यतेल आणि वनस्पती इत्यादी हे परवानधारक, तसेच नोंदणीधारक व्यावसायिकांकडूनच खरेदी करावेत. अन्नपदार्थ स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी साठवावेत. माशांचा संसर्ग होऊ नये; म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत. परवाना किंवा नोंदणी न घेता अन्नपदार्थांचा व्यवसाय करू नये, अशा सूचना साहाय्यक आयुक्त (अन्न) सु.आ. चौगुले यांनी दिल्या आहेत.