राष्ट्ररक्षणासाठी श्री गणेशाला बळ मागा !
आज श्री गणेशचतुर्थी ! गणरायाच्या आगमनासाठी आतुरलेल्या सर्वच गणेशभक्तांना ‘गणपतीबाप्पा मोरया’चा जल्लोष कोरोना महामारीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता मोठ्या प्रमाणात करता येणार आहे ! गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध यंदा हटवले गेल्याने गणेशभक्तांना परत एकदा पूर्वीप्रमाणे उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. ‘श्री गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशी या १० दिवसांच्या काळातील उत्साह, आनंद आणि चैतन्य वर्षभर टिकून रहावे’, अशी मनीषा प्रत्येक जणच बाळगून असतो. यातूनच हिंदुत्वनिष्ठांनाही धर्मरक्षण आणि धर्माचरण यांसाठी बळ मिळते. उत्सवाच्या चैतन्यातून मिळणारे हे बळ राष्ट्रकार्यासाठी वापरणे, ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यामागची कारणमीमांसा हिंदूंनी सतत अभ्यासली पाहिजे. हिंदूंसाठी आजच्या घडीला ते अत्यंत आवश्यक आहे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने स्वतःच्या जाहीरनाम्यात हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले होते. हीच संधी साधून टिळकांनी गणेशोत्सवास आरंभ करून त्या काळात विविध माध्यमांतून हिंदूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध जनमत निर्माण केले. टिळकांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. स्वातंत्र्यपूर्वकाळातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे अवलोकन लक्षात घेऊन सध्या हिंदूंनी पुढे जायला हवे. नुकतेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. भविष्यातील भारताच्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सवाची भूमिका ठरेल, असा या उत्सवाचा लाभ उठवायला हवा !
भारत हिंदूबहुलच हवा !
गेल्या दीड सहस्र वर्षांपासून हिंदू हा दुर्दैवाने संकटकाळातच वावरत आहे. ‘जणू काही ही संकटे हिंदूंच्या पाचवीलाच पूजलेली आहेत’, असे म्हणता येईल. हिंदु आणि हिंदु धर्म यांच्यावर प्रतिदिनच वैचारिक आणि शारीरिक आघात होत आहेत. ‘एखाद्या हिंदूवर आक्रमण झाले नाही’, असा एकही दिवस जात नाही. हिंदूबहुल भारतात हिंदूंनी किती काळ असुरक्षित रहावे ? याची मर्यादा आता ओलांडली गेली आहे. जो येतो, तो हिंदूंना टपली मारतो, हिंदूंवर आक्रमणे करतो, हिंदु स्त्रियांकडे वासनांध दृष्टीने पहातो, असे गेली अनेक वर्षे चालू आहे. हिंदूंच्याच भूमीवर आज पदोपदी हिंदूंना अवमानित व्हावे लागत आहे. याला कारणीभूत ठरत आहे, ती हिंदूंची सहिष्णु आणि शांतताप्रिय वृत्ती ! आजही ‘हिंदु आतंकवादी’, ‘हिंदु तालिबानी’ अशा प्रकारे हिंदूंना संबोधित केले जाते. त्यामुळे खरोखरचे आतंकवादी किंवा तालिबानी रहातात बाजूलाच ! प्रत्यक्षात धर्मांध कायमच हिंदूंच्या मुळावरच उठल्यामप्रमाणे वागत असतात. धर्मांधांची आततायी वृत्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांचा एकमेकांशी तितकाच संबंध आहे; कारण वर्ष १८९४ मध्ये मुंबईत मुसलमानांनी दंगा केला आणि पुढील २ मासांत टिळकांनी सार्वजनिकपणे गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. टिळक म्हणतात, ‘‘मुसलमानांच्या चढेलपणाच्या वृत्तीमुळेच हा उत्सव हाती घेण्याची कल्पना सुचली !’’ जे टिळकांच्या काळात होत होते, तोच चढेलपणा आजही अगदी प्रतिदिन चालूच आहे. मध्यंतरी झालेल्या नूपुर शर्मा प्रकरणामुळे सर्वांनाच त्याचा प्रत्यय आलेला आहे. नूपुर शर्मा यांचे एक विधान आणि धर्मांधांनी त्यानंतर घडवून आणलेल्या अनेक हत्या यांचे उमटत असलेले पडसाद भीषण आहेत. कायदा-सुव्यवस्था, पोलीस, प्रशासन कशालाही न जुमानणार्या मुजोर धर्मांधांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्ष २०१२ च्या आझाद मैदान दंगलीतील ‘अमर जवान स्मृतीस्तंभा’ला लाथाडणार्या धर्मांधाची जागा आता ‘सर तन से जुदा’ ही घोषणा देणार्या धर्मांधाने घेतलेली आहे. या घोषणेमुळे आता प्रतिदिन सामान्य हिंदूंवरही टांगती तलवारच आली आहे ! ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेकडून यापूर्वी काफिरांचे शिरच्छेद करण्याचे विदेशातील अनेक ‘व्हिडिओ’ प्रसारित करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ हिंदू पाहूही शकणार नाहीत, इतके भयानक होते; पण आज त्याच व्हिडिओचे पडसाद आपल्या सर्वांच्या डोळ्यांदेखत प्रत्यक्ष भारतात उमटत आहेत. ‘सर तन से जुदा’ ही घोषणा म्हणजे त्यांच्या दृष्टीने इस्लामी राज्याचा एकप्रकारे पुरस्कार केल्यासारखेच आहे. अर्थात् या घोषणेला घाबरून न जाता हिंदूंनी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम् ।’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांचा निनाद करून धर्मांधांच्या हृदयात धडकी भरवली पाहिजे; कारण अजूनही हा भारत हिंदूबहुल आहे. ‘आपल्याला त्याला धर्मांधबहुल कदापि होऊ द्यायचे नाही’, असे हिंदूंनी ठरवले पाहिजे; परंतु त्यासाठी हिंदूंकडे असणार्या संख्याबळात धर्माभिमान आणि क्षात्रवृत्ती येणे आवश्यक आहे.
टिळकांचा उद्देश समजून कृती करा !
गणेशोत्सवानिमित्ताने हिंदू मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. हिंदूंचे हे संघटन सत्कारणी लागले पाहिजे. केवळ मनोरंजन आणि मौजमजा यांत हिंदू गाफिल राहिले, तर त्यांना सध्याच्या वास्तवाचे भान नाही, असेच म्हणावे लागेल. या संख्याबळाचा लाभ उठवून हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती केली पाहिजे. असे सर्व मंडळ प्रमुखांनी केले, तर टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल. हिंदू आणि गणेशभक्त यांनी या निमित्ताने श्री गणेशाकडे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ उभे रहाण्यासाठी बळ मागितले पाहिजे. ‘विघ्नहर्ता हे श्री गजाननाचे मारक रूप आहे’ याची जाणीव हिंदूंनी मनात जागृत ठेवली पाहिजे आणि सध्या हिंदु धर्मबांधव अनुभवत असलेल्या संकटाविषयी श्री गणेशाला साकडे घातले पाहिजे. देशातील आंतर्बाह्य शत्रूंचा बीमोड करण्यासाठी हिंदूंनी या निमित्ताने श्री गणेशाला आळवून त्याची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
निसर्गनियम न पाळल्याने रज-तमाचे प्रमाण वाढून नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चंगळवाद सोडून मानवाने राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणेच हिंदूंसाठी कालसुसंगत ठरणार आहे. श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या दिशेने कार्यरत होणार्या शुभकार्याचा प्रारंभ श्री गणेशपूजनाने करूया आणि तत्पूर्वी येणार्या सर्व संकटांतून तारून जाण्यासाठी संघटितपणे श्री गणेशालाच शरण जाऊया !