गणेशभक्तांनो, कागदी लगद्याची गणेशमूर्ती प्रदूषणकारीच आहे, हे जाणा !
#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh
गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौदात विसर्जन’, ‘मूर्तीदान करा’ आणि ‘कागदी लगद्याच्या मूर्ती वापरा’, मूर्ती (विसर्जनासाठी नव्हे) ‘विघटना’साठी ‘अमोनियम बायकार्बोनेटचा वापर’ यांसारख्या अशास्त्रीय, अघोरी आणि स्वयंघोषित धर्मोपदेशकाप्रमाणे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. या वर्षी नागरिकांनी गणेशोत्सवासाठी शाडू माती, तुरटी किंवा कागदी लगदा यांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक (विघटनशील) मूर्तींना प्राधान्य द्यावे किंवा धातू, लाकूड, दगड यांपासून बनवलेल्या पुनर्वापर करता येणार्या मूर्ती वापराव्यात, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. ज्या पर्यावरणरक्षणासाठी ते कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती वापरण्यास सांगत आहेत, त्यामुळे उलट जलप्रदूषण होते, हे महापालिकेला लक्षात कसे येत नाही ?
कागदी लगद्यापासून (पेपर मेड) विशेषत: वर्तमानपत्रापासून सिद्ध केलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण होते, असे विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कागदी लगद्यापासून केलेल्या मूर्ती पर्यावरणाला पूरक नसून उलट पर्यावरण विघातक आहेत.
कागदी लगद्यामुळे होणार्या जलप्रदूषणाच्या संदर्भातील संशोधन आणि त्या विरोधातील लढा !
१. काँग्रेस शासनाच्या काळात महाराष्ट्र शासनाने कागदी लगद्यापासून श्री गणेशमूर्ती करण्यास प्रोत्साहन देणारे अवैज्ञानिक परिपत्रक काढले. (३ मे २०११)
२. कागदी लगद्याची मूर्ती प्रचंड प्रदूषणकारी असल्याचे मान्यताप्राप्त ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था, माटुंगा यांच्या प्रयोगशाळेत सिद्ध करण्यात आले ! (वर्ष २०११)
३. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्या, तरी तो कागद पाण्यातील प्राणवायू शोषून घेतो. त्यामुळे जलचरांच्या जिवाला धोका निर्माण होतो ! – पर्यावरणतज्ञ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार श्री. किशोर वसंतराव मार्डीकर (हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद, मुंबई) (वर्ष २०१२)
‘कागदी लगद्याची मूर्ती प्रदूषण करते’, हा राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय !
हिंदु जनजागृती समितीने कागदी लगद्याची मूर्ती अतीप्रदूषणकारी असल्याने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका प्रविष्ट केली होती. त्यात दिलेली तथ्ये ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने मान्य करत कागदी लगद्यांच्या मूर्तींचा वापर करण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली. या वेळी शासनाला दिलेल्या आदेशामध्ये ‘कागदी लगद्यापासून मूर्ती करण्यास कोणतेही प्रोत्साहन देऊ नये’, असे सुस्पष्ट नमूद केले आहे. (३० सप्टेंबर २०१६)
अन्य संशोधने !
१. या संदर्भात मुंबईतील प्रसिद्ध ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्थे’ने संशोधन केले. या संशोधनाअंती ‘१० किलो कागदी लगद्याच्या मूर्तीमूळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते’, तसेच ‘त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडियम, टायटॅनिअम ऑक्साईड असे विषारी धातू आढळले’, असे गंभीर निष्कर्ष सांगितले.
२. सांगली येथील पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरन्मेंटल प्र्र्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले असता, कागद विरघळवलेल्या या पाण्यात ‘ऑक्सिजन’ची मात्रा शून्यावर आल्याचा अत्यंत घातक परिणाम त्यांच्या प्रयोगात स्पष्ट केला. (वर्ष २०१९)
मंडळांना नोटिसा !
१. मालाड येथील ‘बाळ गोपाळ मित्र मंडळा’ला कागदी लगद्याची मूर्ती बनवल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस देण्यात आली.
२. लालबाग येथील ‘तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट’ने सिद्ध केलेल्या कागदी लगद्याच्या २१ फूट उंचीच्या मूर्तीच्या स्थापनेमुळे होणारे प्रचंड जलप्रदूषण लक्षात घेऊन अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तसेच कर्तव्यात कुचराई करत असल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. (वर्ष २०१९)
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचा भोवतालच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करून (या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो.) केलेल्या चाचणीत कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीमुळे वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण मूळ स्पंदनांच्या तुलनेत पुष्कळ वाढलेले आढळले. ही मूर्ती ‘कागदाचा लगदा’ या असात्त्विक आणि अशास्त्रीय घटकापासून बनवलेली असल्याने नकारात्मक स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात. अशी श्री गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक असते !
– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.८.२०१७)