राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे सक्तवसुली संचालनालयाकडून अन्वेषण चालू !
बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे पूर्वी संचालक असलेल्या ‘ग्रीन एकर’ या आस्थापनाने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार सक्तवसुली संचालनालयाला प्राप्त झाली आहे. ११ सहस्र ४०० कोटी रुपयांच्या पी.एन्.बी. बँक घोटाळ्याच्या प्रकरणात सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान हे आस्थापनाच्या संचालकपदी होते. या आस्थापनाच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आली होती. त्यानुसार सध्या रोहित पवार यांचे सक्तवसुली संचालनालयाकडून अन्वेषण चालू असल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार ‘ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि.’ या आस्थापनात रोहित पवार हे वर्ष २००६ ते २०१२ या कालावधीत संचालक होते. त्यांचे वडील राजेंद्र पवार हेही वर्ष २००५ ते २००९ या कालावधीत संचालक होते. वाधवान यांचे नाव बँक घोटाळ्यात समोर आल्यावर रोहित पवार यांनी आस्थापनाच्या संचालकपदाचे त्यागपत्र दिले होते.
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. जवळपास १० ते १५ मिनिटांची ही भेट झाली. भाजपचे मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. |