पुणे येथील ‘साईनाथ मंडळ ट्रस्ट’चा यंदा आझाद हिंद सेनेवर जिवंत देखावा
पुणे – वर्षभरात १०० हून अधिक सामाजिक उपक्रम राबवणारे मंडळ, अशी ओळख असलेल्या येथील बुधवार पेठेतील, ‘साईनाथ मंडळ ट्रस्ट’च्या वतीने या वर्षी ‘आझाद हिंद सेने’वर १५ कलाकारांच्या साहाय्याने जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे. या मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांच्या वतीने हे देखावे लिहिले जातात आणि मंडळाच्याच कार्यकर्त्यांच्या वतीने ते सादर केले जातात.
या मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सवात समाजातील विविध विषयांवर जिवंत देखावे सादर केले जातात. मंडळाने यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण केले असून मागील ११ वर्षांत १ सहस्रहून अधिक उपक्रम केले आहेत. विशेष म्हणजे सामाजिक प्रबोधन आणि सजीव देखावे सादर करण्यावर विशेष भर दिला जातो. मंडळाला आजपर्यंत विविध स्पर्धांत ७५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.