दारूबंदीचा प्रश्न !
संपादकीय
दारू प्यायल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. दारूचे व्यसन लागले, तर व्यक्तीचा विनाश होतोच; मात्र त्याच्या कुटुंबाचीही वाताहत होते, हे आपण कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि विशेषतः खालच्या वर्गात नेहमी पहातो. दारू प्यायल्यामुळे कुणाचे भले झाले आहे, असे म्हणताच येणार नाही; मात्र हानी किती होते ? याची कल्पनाच करता येत नाही, तरीही जगभरात मोठ्या प्रमाणात दारूची निर्मिती होते आणि तिचे सेवन केले जाते. यातून प्रत्येक देशाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो आणि तो विकासकामांसाठी वापरला जातो. दारूप्रमाणेच तंबाखूजन्य पदार्थही आहेत, जे मनुष्याच्या आरोग्यास अपायकारक आहेत; मात्र त्यावर कोणतीही बंदी नाही. त्यांच्या उघड विक्रीला अनुमती आहे. त्यातूनही सरकारला महसूल मिळत असतो. गेल्या २ वर्षांत कोरोनामुळे असलेल्या दळणवळण बंदीमुळे सर्वकाही बंद होते, तेव्हा केवळ महसूल मिळावा; म्हणून दारूविक्रीला अनुमती देण्यात आली होती, हे लक्षात घ्यायला हवे. नुकतेच देहली सरकारने तर कोरोनाच्या काळात दारू विक्रेते आणि उत्पादक यांची आर्थिक हानी झाली म्हणून त्यांना करामध्ये सवलत दिल्याचे समोर आले आहे. यातून दारूचे सरकारच्या दृष्टीने महत्त्व लक्षात येते. कोरोनाच्या काळात दारू मिळेनाशी झाल्याने अनेकांची मानसिक स्थिती अत्यंत वाईट झाल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. काही जणांनी दारूविक्री चालू करण्यासाठी सरकारकडे मागणीही केली होती. काही जणांनी दारू न मिळाल्याने आत्महत्याही केल्याचे म्हटले गेले. ‘दारू पिऊन वाहन चालवू नये’, असा कायदा आहे. त्याचे पालन केले जाते कि नाही, हे वाहतूक पोलिसांकडून तपासलेही जाते. तरीही दारू पिऊन वाहन चालवल्याने अनेक अपघात होतात आणि अनेक निरपराध्यांचे नाहक प्राण जातात.
दारूमुळे होणारी हानी ठाऊक असली, तरी त्यावर बंदी घालण्यासाठी निवडणुकीमध्ये कुणीही आश्वासन देत नाही. जर कोणत्याही राजकीय पक्षाने असे आश्वासन दिले, तर त्याला निवडणुकीत मते मिळणार नाहीत, हे उघड सत्य आहे. म्हणजे समाजालाही दारू हवी आहे आणि सरकारलाही ! तरीही भारतातील काही राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत दारूवर बंदी घालण्यात आलेली आहे. मोहनदास गांधी यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये गेल्या ७० वर्षांपासून दारूबंदी आहे. बिहार राज्याने २ वर्षांपूर्वीच दारूवर बंदी घातली आहे. मिझोराम, नागालँड आणि लक्षद्वीप येथेही गेल्या काही वर्षांपासून दारूवर बंदी आहे. आता बंदी घातली म्हणजे तेथे दारूचे उत्पादन, विक्री होऊ नये, असे अपेक्षित आहे; मात्र असे प्रत्यक्षात होत असल्याचे दिसत नाही. गुजरातमध्ये अनेक वेळा विषारी दारूचे सेवन केल्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वीच अशी घटना गुजरातमध्ये घडली आणि काही जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला. दारूबंदी असतांना अशा घटना घडतात, हे चिंताजनक आहे. विषारी दारू केवळ दारूबंदी असणार्या राज्यांतच विकली जाते असे नाही, तर आतापर्यंत देशातील अनेक राज्यांत त्यात महाराष्ट्रही आहे, जेथे विषारी दारूमुळे लोकांचे जीव गेले आहेत. हे का होते ? हे जनतेला ठाऊक आहे आणि शासनकर्त्यांनाही ठाऊक आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना कधीही निघत नाही. त्यामुळे अशा घटना काही काळांनी देशात कुठेना कुठे घडतात.
व्यसनमुक्तीसाठी साधना आवश्यक !
असेही म्हटले जाते की, ज्या राज्यांत दारूची विक्री अल्प आहे किंवा दारू पिणारे लोक अल्प आहेत, तेथे दारूबंदी करण्यासाठी दारू उत्पादन करणार्या आस्थापनांकडून राज्य सरकारवर दबाव निर्माण केला जातो. कारण जर दारूबंदी केली, तर काळ्याबाजाराद्वारे त्या राज्यांत दारू विकली जाते आणि त्याची किंमत मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असते. अनेक राज्यांत चोरमार्गाने दारू विकली आणि प्यायली जाते. देशातील अनेक गावांमध्ये महिलांनी दारूबंदीच्या विरोधात आंदोलनेही केली आहेत आणि गाव दारूमुक्त केले आहे. दारूचे गुत्ते बंद पाडले आहेत. दारूमुळे अनेक महिलांच्या संसाराची राखरांगोळी झाली, मुलांची परवड झाली. हे पहाता सरकारने कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी दारू पिण्यासाठी सरकारकडून अधिकृत परवाना घ्यावा लागतो; मात्र तसा परवाना अनेक जण घेत नाहीत. ते कुठे सापडले, तर पोलीस लाच घेऊन त्यांना सोडून देतात, असेही दिसून येते. म्हणजेच कायदे केले किंवा बंदी घातली, तरी त्यांची कार्यवाही करणारे प्रामाणिक नसतील, तर त्यातून काहीच साध्य होत नाही. गणेशोत्सवासारख्या सणांच्या वेळी शहरात दारूबंदीचे आदेश देण्यात येतात; परंतु तरीही दारू पिऊन मिरवणुकीत नाचरणारे सर्रास आढळतात. देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी आहे; मात्र तरीही प्रतिदिन मोठ्या प्रमाणात गोहत्या या राज्यांत होत असतात आणि गोमांसाची विक्री केली जाते. याला भ्रष्ट सरकारी यंत्रणा उत्तरदायी असते, तसेच शासनकर्त्यांची इच्छाशक्ती अल्प पडते, हेही लक्षात येते. ‘केवळ कायदे केले म्हणजे आपले दायित्व संपले’, असे त्यांना वाटते. गुजरातमध्ये अनेकदा विषारी दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्यावर सरकारकडून कठोर उपाययोजना काढणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. बिहारमध्येही बंदी घातल्यानंतर दोन वेळा विषारी दारूमुळे लोकांचे प्राण गेले, तरी सरकार कठोर कारवाई करत नाही ज्यामुळे इतरांना वचक बसेल. ज्या सुसंस्कृत समाजाला दारूचे गंभीर दुष्परिणाम लक्षात येतात, त्याने याविरोधात संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक आहे. तसेच महिला संघटना, महिला आयोग, सामाजिक संघटना यांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याचसमेवत दारूच्या व्यसनातून लोकांना मुक्त करण्यासाठी त्यांना साधना शिकवणे, त्यांच्याकडून ती करवून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. साधनेमुळे व्यक्ती व्यसनांपासून दूर रहाते, हे सत्य आहे. आज वारकरी संप्रदाय किंवा अन्य काही आध्यात्मिक संघटनांचे कार्य यांमुळे कितीतरी जणांची दारू सुटल्याची उदाहरणे समाजात आढळतात. यावरून निर्व्यसनी समाजाच्या निर्मितीसाठी साधना आणि धर्मशिक्षण यांची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येईल !
समाजामध्ये असणारी व्यसनाधिनता नष्ट करण्यासाठी समाजाला साधनेला लावणे आवश्यक ! |