श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ?
#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh
शक्यतो गणेशमूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी
अ. श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे.
आ. मूर्ती हातात घेणार्याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.
इ. मूर्ती आणतांना तिच्यावर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे. मूर्ती घरी आणतांना मूर्तीचे मुख आणणार्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी. मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्त्व, तर पाठच्या भागातून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत असते. मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो. तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे. मूर्तीचे मुख त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्त्वाचा लाभ होतो, तर इतरांना निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.
ई. श्री गणेशाचा जयजयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी.
उ. घराच्या उंबरठ्याबाहेर उभे रहावे. घरातील सुवासिनीने मूर्ती आणणार्याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे.
ऊ. घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी.
सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी. सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी. मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही, याची काळजी घ्यावी. मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रूमाल घालून ती झाकून ठेवावी. उंदराची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी.
गणेशमूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असावे ?
मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावी. पूजकाने पूजा करतांना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला येणार नाही, अशा पद्धतीने बसावे. पूजा करतांना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी यासाठी पुढील पर्याय आहेत –
१. मूर्तीचे मुख पश्चिमेला किंवा दक्षिणेला असल्यास पूजकाचे मुख आपसूकच अनुक्रमे पूर्व आणि उत्तर दिशेला होईल. पण
२. मूर्तीचे मुख पूर्वेला असल्यास पूजकाने पश्चिमेला मुख करून पूजा न करता मूर्तीच्या उजव्या हाताला उत्तरेकडे तोंड करून बसावे.
३. मूर्तीचे मुख उत्तरेला असल्यास पूजकाने दक्षिणेकडे मुख करून पूजा न करता मूर्तीच्या डाव्या हाताला पूर्वेकडे तोंड करून बसावे.
दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते, उदा. काली, हनुमान, नरसिंह इत्यादी. गणपतीची जी मूर्ती आपण आणतो, ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते; म्हणूनच शक्यतो तिला दक्षिणमुखी ठेवू नये.