ठाणे स्मार्ट सिटी ‘मोबिलिटी सोल्युशन्स’ या प्रकारात प्रथम पुरस्काराने सन्मानित !
संदीप माळवी देशातील सर्वांत लोकप्रिय ‘स्मार्ट सिटी’ मुख्य कार्यकारी अधिकारी
ठाणे, २८ ऑगस्ट (वार्ता.) – ‘स्मार्ट सिटीज् कौन्सिल इंडिया’च्या वतीने, तसेच केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने २६ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथे ‘राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन’ परिषदे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ठाणे महानगरपालिकेच्या ‘ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड’ला ‘मोबिलिटी सोल्युशन्स’ या प्रकारात प्रथम पुरस्कार देण्यात आला. देशातील १०० ‘स्मार्ट सिटीज् मुख्य कार्यकारी अधिकार्यां’मधून देशातील ‘सर्वांत लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी’ हा सन्मानाचा पुरस्कार ‘ठाणे स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांना देण्यात आला आहे.
‘हॉटेल सहारा इंटरनॅशनल’ येथे ही ‘राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन परिषद’ पार पडली. त्यात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत महाराष्ट्राच्या कामगिरीची, तसेच शासनाच्या वतीने चालणार्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. केंद्र सरकार, राज्य शासन आणि ठाणे महापालिका यांच्या वतीने ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रकल्पांचे काम चालू आहे. मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. ‘स्मार्ट सिटीज् काऊन्सिल इंडिया’ ही संस्था केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटीज् मिशन’समवेत काम करत असून प्रतिवर्षी ‘स्मार्ट सिटी विशेष प्रकल्प पुरस्कार’ देण्यात येतात. ॲानलाईन मतदानाच्या माध्यमातून पुरस्कार निवडले जातात. स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक प्रताप पदोदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.