काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्न विचारल्यावर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला !
प्रश्न विचारणार्या वृत्तवाहिनीच्या संपादिकेवर भडकले !
नवी देहली – इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’मधील एका चर्चासत्रात काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि श्रीनगरचे लोकसभेचे विद्यमान सदस्य फारूख अब्दुल्ला यांना वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्यात झालेल्या हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी विचारल्यावर ते भडकले आणि त्यांनी कायक्रमातून काढता पाय घेतला. (उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्याने सत्य लपणार नाही. अब्दुल्ला यांना एक दिवस हिंदूंच्या प्रश्नांना उत्तर द्यावेच लागेल ! – संपादक) ‘टाइम्स नाऊ’च्या संपादिका नाविका कुमार यांनी त्यांना काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्न विचारल्यावर, ‘तुम्ही काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी प्रश्न विचारल्यास मी कार्यक्रमातून निघून जाईन. तुम्ही मुद्दामहून जुन्या जखमांवरील खपल्या काढत आहात’, असा अब्दुल्ला यांनी आरोप केला.
सौजन्य : TIMES NOW
१. अब्दुल्ला यांनी नाविका कुमार यांना ‘तुम्ही काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी मला प्रश्न विचारून पक्षपाती भूमिका घेत आहात. तुम्ही भाजपच्या प्रतिनिधी असल्याप्रमाणे प्रश्न विचारत आहात’, असाही आरोप केला. (काश्मिरी हिंदूंविषयी कुणी आवाज उठवल्यास त्याच्यावर ‘भाजपचा प्रतिनिधी’ असल्याचा ठपका ठेवत विषयाला बगल देणारे अब्दुल्ला ! – संपादक) ‘ज्यांना खोरे सोडण्यास भाग पाडले गेले ते सर्व हिंदू मला भावासारखे होते’, असेही ते म्हणाले. (काश्मिरी हिंदू भावासारखे होते, तर त्यांच्या हत्या का होऊ दिल्या ?’, हेही अब्दुल्ला यांनी सांगायला हवे ! – संपादक)
२. चर्चासत्राच्या वेळी नाविका कुमार यांनी अब्दुल्ला सत्तेवर असतांना हत्या करण्यात आलेले न्यायमूर्ती नीलकंठ गंजू, टिकालाल टपलू आणि पत्रकार प्रेमनाथ भट्ट या काश्मिरी हिंदूंविषयी विचारले असता त्यांनी मुलाखतीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि चर्चासत्रातून निघून गेले.
३. या चर्चासत्राचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर अनेकांनी अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे. टी.व्ही.९ वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आणि काश्मिरी हिंदू असलेले आदित्य राज कौल यांनी, ‘चर्चासत्रातून पळ काढणारे फारूख अब्दुल्ला यांनी वर्ष १९९० मध्येही पळ काढला आणि हिंदूंना जिहादी आतंकवाद्यांच्या हातून मरण्यासाठी सोडून दिले’, अशी टीका केली.
संपादकीय भूमिकानॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी नेहमीच काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी बोलणे टाळले. त्यांच्या कार्यकाळात हिंदूंच्या हत्या झाल्यामुळे तेही याला उत्तरदायी आहेत. अशा सर्वांवर खटला चालवून त्यांना शिक्षा होणे आवश्यक ! |