शिस्तबद्धता आणि आयुर्वेदानुसार जीवन जगणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे वैद्य मेघराज माधव पराडकर !
श्रावण कृष्ण दशमी, म्हणजेच २१.८.२०२२ या दिवशी वैद्य मेघराज पराडकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. शिस्तबद्धता : ‘मेघराजदादांचे ‘कोणत्या वेळेत काय करायचे’, याचे नियोजन ठरलेले असते. ते पहाटे लवकर उठतात आणि रात्री वेळेवर झोपतात. त्यांच्या या दिनचर्येत कधीही खंड पडत नाही. त्यांचा प्रत्येक कृती वेळेवर करण्याचा प्रयत्न असतो.
१ आ. आयुर्वेदानुसार आचरण : ते केवळ इतरांना आयुर्वेदानुसार आचरण करा, असे सांगत नाहीत, तर त्यांची दिनचर्याही त्याचप्रमाणे असते.
१ इ. संयम : दादा शिर्षासन शिकत असतांना त्यांना ते जमत नव्हते; परंतु त्यांनी ते करायचे प्रयत्न कधी सोडले नाहीत. काही दिवस सराव केल्यावर त्यांना ते जमू लागले. त्यांच्या बोलण्यात कधीही उतार-चढाव नसतो. ते एकाच स्वरात बोलतात. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकावेसे वाटते.
१ ई. इतरांना साहाय्य करणे : मी करत असलेल्या संगणकीय सेवेत कधी कधी तांत्रिक अडचणी येतात. तेव्हा दादा मला त्या अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने साहाय्य करतात.
१ उ. अहं अल्प असणे : दादांना संगणक, संस्कृत भाषा, आयुर्वेद अशा विविध विषयांचे पुष्कळ ज्ञान आहे, तसेच त्यांच्यातील शिकण्याच्या वृत्तीमुळे ते अनेक गोष्टी शिकत असतात; परंतु त्यांच्या बोलण्यातून त्याविषयी कधी अहं जाणवत नाही.
२. वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर
२ अ. भाषेवरील प्रभुत्व : ‘मेघराजदादांचे संस्कृत भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांना मराठी भाषेतील कठिणातील कठीण विषयही सहज आणि सोप्या भाषेत मांडता येतो. ते सूत्र इतके सोपे करून मांडतात की, अशिक्षित व्यक्तीलाही त्याचे आकलन होईल.
२ आ. प्रांजळपणा : सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये फसवाफसवी किंवा रुग्णांना लुबाडण्याची वृत्ती दिसून येते. रुग्णाला बरे करण्याच्या आशेवर ठेवून त्यांच्याकडून विनाकारण पैसे उकळले जातात. दादा सांगतात, ‘‘आपण अभ्यासपूर्वक आणि सर्व प्रयत्न करूनही दिलेल्या उपचारांनी रुग्णाला ठराविक कालावधीमध्ये अपेक्षित लाभ होतांना दिसत नसेल, तर त्याला तसे प्रांजळपणे सांगायला हवे. त्याच्या आजाराची कारणे अन्यही असू शकतात. त्या दृष्टीने रुग्ण उपाययोजना करून बरेही होऊ शकतात.’’
२ इ. आधी केले, मग सांगितले, या उक्तीप्रमाणे वागणे : दादा स्वतः नियमित व्यायाम करतात. त्यामुळे साधक त्यांना कोणत्याही त्रासाविषयी सांगतात. तेव्हा तो त्रास दूर होण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले व्यायाम करण्यास ते प्रोत्साहित करतात. त्यांची कोणतीही कृती असो, इतरांना त्या संदर्भात सांगण्यापूर्वी ते ती कृती स्वतः करतात. ते विविध लेख लिहितात, त्या वेळीही ते प्रथम त्यानुसार कृती करून पहातात आणि मग लिहितात. त्या संदर्भात ते सांगतात, ‘‘आपले बोलणे आणि कृती योग्य असेल, तर लिखाणात चैतन्य येऊन ते कार्यरत होते अन् मग ती कृती करणार्या सर्वांना त्याचा लाभ होतो.’’ त्यांचे लेख वाचून साधकही कृतीप्रवण होत असल्याचे सांगतात.
२ ई. रुग्णांना काळजीपूर्वक आणि प्रेमाने हाताळणे : औषधे देऊन रोग बरा करण्यापेक्षा रोगाचे समूळ उच्चाटन करण्याकडे त्यांचा कल असतो. यासाठी ते रोग निर्माण होण्यामागील मूळ कारणे शोधतात आणि रोग बरा होण्यासाठी त्यांना आदर्श जीवनशैलीचे महत्त्व पटवून देतात, उदा. शास्त्रोक्त दिनचर्या (प्रतिदिन करायच्या कृती), ऋतुचर्या (ऋतूनुसार जीवनशैलीमध्ये करायचे पालट), आहार आणि विहार यांच्या पालनामध्ये त्यांच्याकडून होणार्या चुका ते तत्त्वनिष्ठतेने सांगून त्या सुधारण्यास सांगतात. दादा रुग्णाच्या प्रकृतीचा विचार करून ‘त्याला पालन करण्यास सोपे जाईल’, असे आवश्यक पथ्यही सांगतात. रुग्णांनी त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास त्यांना सकारात्मक लाभही होत आहेत.
२ उ. शिकण्याच्या स्थितीमध्ये असणे
१. त्यांना कुठल्याही सूत्राविषयी शंका असतील, तर ते त्याविषयी त्यातील तज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेतात. ते नेहमी शिकण्याच्या स्थितीमध्ये असतात.
२. दादा म्हणतात, ‘‘आपल्यातील ‘वैद्य’ सदैव जागृत हवा आणि त्याची दृष्टी चौफेर असावी.’’ कोणतीही कृती करतांना दादा रुग्णांना कोणत्या समस्या येतात, त्याचा अभ्यास करतात, उदा. भांडी घासण्याची सेवा करतांना कुठल्या स्थितीमुळे साधकांना त्रास होऊ शकतो, याचा ते अभ्यास करतात. त्यामुळे कुणीही त्यांच्याकडे ‘भांडी घासण्याची सेवा केल्यामुळे हा त्रास होत आहे’, अशी समस्या घेऊन आल्यास त्यांना त्यावर उपाययोजना सांगता येते आणि ती नेहमीसाठी अमलात आणल्यास त्या साधकाला पुन्हा तो त्रास होत नाही. यातून पुष्कळ औषधोपचार न करताही साधकांना आराम अनुभवता येतो. दादांना रुग्णाचे केवळ त्रास सांगितले, तरी रुग्णाला न पहाता किंवा रुग्ण तपासणी न करताही ते रुग्णाचे अचूक निदान करतात आणि त्यावरील योग्य चिकित्सा सांगतात.
२ ऊ. इतरांना साहाय करणे
२ ऊ १. प्रत्येक कृतीला साधनेची जोड देणे : मी आयुर्वेदाचे शिक्षण घेत असतांना ‘व्यस्ततेमुळे माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होतात’, याची मला खंत वाटायची. तेव्हा ‘आयुर्वेदाचे शिक्षण मी साधना म्हणून कसे शिकून घ्यायला हवे आणि पुढे त्याचा लाभ समष्टी सेवेसाठी कसा होऊ शकतो ?’, यांविषयी त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. दादांनी सांगितलेला भाव ठेवल्यामुळे मी साधना म्हणून आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण करू शकले.
२ ऊ २. सहजतेने साहाय्य केल्याने दादांचा आधार वाटणे : माझ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये ते मला नेमकेपणाने, आपुलकीने आणि सहजतेने साहाय्य करतात. त्यामुळे मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते. मला आणि माझ्या आई-वडिलांनाही दादांचा आधार वाटतो.
२ ए. प्रेमभाव : त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांनी अनेक वैद्यांना पुष्कळ जोडून ठेवले आहे. गुंतागुंतीच्या रुग्णांच्या संदर्भात ते इतर वैद्यांशी विचारविनिमय करून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करतात.
२ ऐ. दादांमधील नम्रता, जिज्ञासा, संशोधक वृत्ती, तत्परता आणि आज्ञापालन या गुणांचे अनेक वैद्यही कौतुक करतात.
२ ओ. अनुभूती
१. घरी असतांना काही वेळा माझ्या मनात ‘सेवा करावी’, असा विचार यायचा. त्याच वेळी दादांचा दूरभाष यायचा आणि ते मला आयुर्वेदाशी संबंधित काही संदर्भ शोधायला सांगायचे.
२. अनेक वेळा मेघराजदादांचे बोलणे, वागणे किंवा त्यांचे विचार ऐकून ‘पू. (कै.) वैद्य विनय भावेकाकाच बोलत आहेत’, असे मला जाणवते.
२ औ. जाणवलेले पालट : मेघराजदादांमध्ये पूर्वीपेक्षा इतरांचा विचार करणे, इतरांच्या समस्या शांतपणे ऐकणे, सर्वांशी प्रेमाने बोलून त्यांना आधार देणे, यांत सहजता आली आहे, तसेच त्यांचे इतरांशी मोकळेपणाने बोलणे हे समष्टी गुण वृद्धींगत झाले आहेत. या गुणांच्या वृद्धीमुळेच ‘त्यांचा समष्टी भाव वाढून त्यांच्या आनंदामध्ये वाढ झाली आहे’, असे मला वाटते.
मेघराजदादांमधील सकारात्मकता, त्यांचे आचरण, त्यांची सात्त्विक बुद्धी, स्थिरता, आत्मसंयम आदी गुणांमुळे ते एखाद्या ऋषीप्रमाणे वाटतात.
२ अं. प्रार्थना आणि कृतज्ञता : ‘हे श्री विष्णुस्वरूप गुरुदेव, आपणच आम्हाला मेघराजदादांसारखे बहुगुणी सहसाधक देऊन त्यांच्याकडून शिकण्याची संधी देत आहात. त्याबद्दल आम्ही आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.
त्यांच्याकडून शिकून मला आपल्याला अपेक्षित असे घडता येऊ दे आणि शीघ्रातीशीघ्र आपल्या पावन चरणांशी एकरूप होता येऊ दे, हीच आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना.’ (२१.८.२०२२)