असात्त्विक रांगोळीतून वातावरणात पुष्कळ नकारात्मक स्पंदने, तर सात्त्विक रांगोळीतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

३१ ऑगस्ट २०२२  या दिवसापासून चालू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने…

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक आहे. सणा-समारंभात घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. सनातनच्या साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून देवतातत्त्व आणि आनंद आदी स्पंदने आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळीच्या कलाकृती बनवल्या आहेत. या रांगोळ्या सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या (भाग १) (रांगोळ्यांच्या सात्त्विकतेमागील शास्त्रासह)’ मध्ये दिल्या आहेत. सात्त्विक आणि असात्त्विक रांगोळ्यांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी १७.७.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

डॉ. अमित भोसले

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. नकारात्मक आणि  सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – असात्त्विक रांगोळीमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा, तर सात्त्विक रांगोळीमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

असात्त्विक रांगोळी
सात्त्विक रांगोळी

२. निष्कर्ष

असात्त्विक रांगोळीतून वातावरणात पुष्कळ नकारात्मक स्पंदने, तर सात्त्विक रांगोळीतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. सात्त्विक कलाकृती (रांगोळी) काढण्याचे महत्त्व : ‘रांगोळीची कलाकृती काढतांना ‘ती डोळ्यांना कशी दिसते ?’ आणि ‘तिच्यात सात्त्विक स्पंदने आहेत ना ?’, हे दोन्हीही पहाणे महत्त्वाचे असते. कलाकृतीतून प्रक्षेपित होणारी चांगली किंवा त्रासदायक स्पंदने ही कलाकृतीचा आकार (Shape), कलाकृतीतील आकृत्यांची दिशा, कलाकृतीतील आकारांची गतीदर्शकता, रचना, समतोल (Balance) आणि नैसर्गिकता यांवर अवलंबून असतात. प्रत्येक आकाराची स्पंदने निराळी असतात. स्पंदनांनुसार आकारांची सात्त्विक, राजसिक आणि तामसिक अशी विभागणी करता येईल. रांगोळीच्या एका कलाकृतीमध्ये अनेक कलाकृतींचा (आकारांचा) समूह अंतर्भूत असतो. रांगोळीच्या कलाकृतीतील अधिकाधिक आकार सात्त्विक असतील, तर त्या संपूर्ण कलाकृतीची एकूण स्पंदने सात्त्विक होतात.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या (भाग १) (रांगोळ्यांच्या सात्त्विकतेमागील शास्त्रासह’)

३ आ. असात्त्विक रांगोळीतून वातावरणात पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : चाचणीतील असात्त्विक रांगोळीमध्ये रज-तम आकृष्ट करणार्‍या तामसिक आकृत्या आहेत. या रांगोळीकडे पाहून मनाला पुष्कळ त्रासदायक जाणवते. या रांगोळीतून वातावरणात पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. सध्या लोक पेठेत (बाजारात) मिळणारी रांगोळीची पुस्तके विकत घेतात आणि त्यात दिलेल्या रांगोळीच्या कलाकृती पाहून तशा रांगोळ्या काढतात, तर काहीजण मनाने रांगोळीच्या कलाकृती काढतात. सर्वसाधारण लोक साधना करत नसल्याने, तसेच त्यांचा स्पंदनशास्त्राचा अभ्यास नसल्याने त्यांना सात्त्विक आणि असात्त्विक रांगोळी यांमधील भेद ओळखता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून रज-तम आकृष्ट करणारे, तामसिक आकृतीबंध आणि असात्त्विक रंगसंगती असलेल्या रांगोळ्या काढल्या जातात. असात्त्विक रांगोळीतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम रांगोळी काढणारा, ती पहाणारा आणि रांगोळी काढलेली भूमी अन् सभोवतालचे वातावरण या सर्वांवर होतो.

३ इ. सात्त्विक रांगोळीतून वातावरणात पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : चाचणीतील सात्त्विक रांगोळीमध्ये सात्त्विक आकृतीबंध (सात्त्विक आकाराची फुले अन् पाने) अन् सात्त्विक रंगांचा उपयोग केला आहे. रांगोळीची कलाकृती सोपी, सुटसुटीत असून त्याकडे पाहून मनाला आनंद जाणवतो. साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच साधना म्हणून सात्त्विक रांगोळीच्या कलाकृतींची निर्मिती केली आहे. कलियुगात सात्त्विक रांगोळीच्या कलाकृतीमध्ये शक्ती, भाव, चैतन्य किंवा आनंद यांची जास्तीजास्त १० टक्के स्पंदने येऊ शकतात. चाचणीतील सात्त्विक रांगोळीमध्ये ५ टक्के आनंदाची स्पंदने आहेत. चाचणीतील रांगोळीतून वातावरणात (१०.२२ मीटर) पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. सात्त्विक रांगोळी काढल्याने भूमी आणि सभोवतालचे वायूमंडल शुद्ध अन् सात्त्विक बनते, तसेच रांगोळी काढणारा आणि ती पहाणारा यांनाही रांगोळीतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक स्पंदनांचा लाभ होतो.

४. सणासुदीच्या दिवशी आणि एरव्ही सुद्धा सात्त्विक रांगोळी काढा !

हिंदु धर्मातील सर्व सण, तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी किंवा विधीच्या दिवशी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असते किंवा विधीमुळे तेथे आकृष्ट होते. ते तत्त्व आणखी जास्त प्रमाणात यावे अन् त्याचा सर्वांना लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या काढा. सात्त्विक रांगोळ्या काढल्याने भूमी आणि सभोवतालचे वायूमंडल शुद्ध अन् सात्त्विक बनते, तसेच रांगोळी काढणारा आणि ती पहाणारा यांनाही रांगोळीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा लाभ होतो. यामुळे सणासुदीच्या दिवशी आणि एरव्ही सुद्धा सात्त्विक रांगोळ्या काढा !’

– डॉ. अमित भोसले, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, मिरज (३.९.२०२०)

ई-मेल : mav.research2014@gmail.com