शासनाकडून पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक मूर्ती असलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
मुंबई – राज्यशासनाने गणेशोत्सवासाठी राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
या स्पर्धेत शासनाने गुणांकनासाठी गोष्टी घोषित केल्या आहेत. यामध्ये पर्यावरणपूरक मूर्ती, ध्वनीप्रदूषरहित वातावरण, स्वातंत्र्याचा चळवळीच्या संदर्भातील देखावा आणि सजावट, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा, पारंपरिक आणि देशी खेळाच्या स्पर्धा, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक इत्यादींविषयी केलेले कार्य, रक्तदान आणि वैद्यकीय सेवा शिबीर, ‘पाणी वाचवा, मुलगी वाचवा’, सामाजिक सलोखा इत्यादी समाजप्रबोधन विषयावर देखावा आणि सजावट.
या स्पर्धेत सहभागी होणार्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त, स्थानिक पोलिस ठाणे अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची अनुमती घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यशासनाचे www.maharashtra.gov.in, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांचे www.pldeshandekalaacademy.org आणि दर्शनिका विभागाचे संकेतस्थळ httpsःmahagazetteers.com मुंबई यांच्या या संकेतस्थळावर या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे अर्ज ३० ऑगस्टपर्यंत प्रविष्ट करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती, तसेच राज्यस्तरीय समितीच्या वतीने करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने दिली.