देशवासियांमध्ये जागृती !
अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट अपेक्षित गल्ला जमवू शकला नाही. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘तो आपटला अथवा अयशस्वी झाला आहे’, असे म्हणता येईल. ‘आमीर खान यांनी या चित्रपटासाठी पुष्कळ कष्ट घेतले होते, शेकडो लोक त्यासाठी कार्यरत होते, १८० कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट अडीच वर्षांच्या कालावधीनंतर प्रदर्शित झाला’, अशी या चित्रपटाची माहिती प्रसारित करण्यात आली. आमीर खान यांच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याचे मोठ्या प्रमाणात विज्ञापन करण्यात आले होते. त्याच वेळी सामाजिक माध्यमांवर या चित्रपटाच्या विरोधात वातावरण निर्माण होण्यास आरंभ झाला आणि चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी या चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी ट्विटरवर ‘ट्रेंड’ घेण्यात आला. हा ट्रेंड यशस्वीही झाला; कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयी लोकांमध्ये जेवढी उत्सुकता निर्माण करण्यात आली होती, त्या तुलनेत चित्रपटाला लोकांचा थंड प्रतिसाद लाभला. चित्रपटगृहे ओस पडली होती, तर काही अर्धी भरली होती. स्वत: आमीर खान उपस्थित असलेल्या खेळालाही लोकांची तुरळक उपस्थिती होती.
चित्रपटांतून हिंदु धर्माचा अवमान
आमीर खान यांचे चित्रपट पुष्कळ लोकप्रिय होतात, तसेच ते त्यातून कोट्यवधी रुपये कमावतात. याच चित्रपटांमध्ये कधी हिंदूंच्या देवतांवर टीका असते, तर कधी त्यांची खिल्ली उडवलेली असते. ‘पीके’ चित्रपटात ‘शिवपिंडीवर दूध वाहून वाया घालवण्याऐवजी ते गरिबांना द्यावे’, असा सल्ला आमीर खान यांनी हिंदूंना दिला होता. हिंदूंच्या पूजा पद्धतीवरही चित्रपटातून टीका केली होती. तरीही बहुसंख्य हिंदू असलेल्या देशवासियांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले; मात्र ती चूक त्यांनी ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या वेळी सुधारली. सामाजिक माध्यमांवर विरोध करण्याच्या व्यतिरिक्त आमीर खान यांच्या मागील चित्रपटांतील विधानांचे छोटे व्हिडिओ बनवून ते ‘लाल सिंग चढ्ढा’वर बहिष्कारासाठी वापरले. ‘या चित्रपटासाठी १८० रुपयांचे तिकीट खरेदी करण्याऐवजी गरिबांसाठी दूध खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करा’, ‘ज्यांना देशात असुरक्षित वाटते, त्यांचे चित्रपट का पहायचे ?’, अशी विधाने लोकांनी स्वत:च्या आवाजात ध्वनीमुद्रित करून ती प्रसारित केली. आमीर खान यांचे तुर्कीये देशाच्या राष्ट्रपतींच्या पत्नीसमवेतची छायाचित्रे, त्यांच्या विधानांची वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली कात्रणे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आली. या चित्रपटाला विरोध करणार्यांचे कुणी नेतृत्व करत नव्हते अथवा त्यांच्या विरोधाला संघटनात्मक स्वरूप नव्हते. लोकांनी उत्स्फूर्तपणे विरोध केला आणि त्याचा परिणामही तात्काळ आणि मोठा दिसून आला.
लोकांनी जागा दाखवली !
या चित्रपटाची अभिनेत्री करिना कपूर यांनी ‘हा चित्रपट पहाणे न पहाणे हा लोकांचा प्रश्न आहे’, अशा स्वरूपाचे विधान केले होते. चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद अल्प होऊ लागल्यावर तिला उपरती झाली आणि तिने ‘या चित्रपटासाठी शेकडो लोकांनी कष्ट घेतले आहेत, तरी लोकांनी चित्रपट पहावा’, असे विधान केले. अभिनेता अर्जुन कपूर याने या चित्रपटाच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन चित्रपटाला विरोध करणार्यांविषयी ‘गप्प बसल्याचा लोक अपलाभ घेत आहेत, आता याविरुद्ध बोललेच पाहिजे’, असे विधान केल्यावर लोकांनी त्याला‘बॉलीवूडचे चित्रपट आमच्यामुळेच चालतात, हे अर्जुन कपूर याने लक्षात घ्यावे’, असे उत्तर दिले, तसेच ‘तुमचे चित्रपट नाहीतरी फ्लॉप (आपटतात) होतात, आम्हाला वेगळे काही करावे लागणार नाही’, अशी उत्तरे दिली. काहींनी ‘अभिनेता शाहरुख खान याच्या वर्ष २०२३ मध्ये प्रदर्शित होणार्या ‘पठाण’ या चित्रपटावर बहिष्कारासाठी सिद्धता करूया’, अशी चर्चा चालू केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या महानायक अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय कार्यक्रमात आमीर खान यांनी त्यांच्या चित्रपटाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केल्यावर ‘आता अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमावरच बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल’, अशा ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांवर प्रसारीत केल्या. आमीर खान यांच्याविषयी आणि त्यांचे उदात्तीकरण करणार्या प्रत्येकाविषयी लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे, हे या निमित्ताने दिसून आले. अभिनेते अक्षय कुमार हे गुटख्याच्या विज्ञापनात सहभागी झाल्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर त्यांनी क्षमा मागितली, तरी त्याचा फटका ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाला बसलेला दिसला. हा चित्रपटही चांगलाच आपटला आहे.
बॉलीवूडचे चित्रपट एखाद्या चित्रपटाचा आणि अभिनेता-अभिनेत्री यांचा अपवाद वगळता पुष्कळ गाजतात. रातोरात संबंधितांना अमाप प्रसिद्धी मिळते आणि पैसा मिळतो. त्यांचे चित्रपट जनता पहाते म्हणून ते लोकप्रिय होतात; मात्र जेव्हा जनताच ठरवते की, हे चित्रपट चालू देणार नाही, तेव्हा कुणाचे काय चालणार ? बॉलीवूडच्या काही नट-नट्या या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या बातम्या अधूनमधून येतात, काही जण समाजविरोधी विज्ञापनांमध्ये सहभागी असतात. असे असूनही ते आणि त्यांचे चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात रहाणे, हे एक अप्रूप होते. आता काळ पालटला आहे. पूर्वी अधिक प्रमाणात सामाजिक माध्यमे उपलब्ध नव्हती आणि त्यांचा वापरही मर्यादित होता. आता सामाजिक माध्यमांमुळे लोकांना काही अभिनेत्यांचे खरे म्हणजे हिंदु धर्मविरोधी, भारतविरोधी स्वरूप लक्षात येऊ लागले आहे. त्यांचा विरोध करण्यासाठी ते प्रत्येक संधीचा उपयोग करत आहेत. ‘आपण काहीही दाखवले, तरी भारतीय जनता आपल्याला डोक्यावर घेतेच’, हा समज आता बॉलिवूडने दूर केला पाहिजे. भारतियांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम आता जागृत होत आहे. २०० ते ५०० रुपये देऊन काही पहाण्यापेक्षा राष्ट्र आणि धर्म यांप्रती स्वत:चे छोटे का असेना योगदान देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हा भारत आणि हिंदु धर्म यांसाठी नक्कीच आशेचा किरण आहे !
राष्ट्रघातकी आणि धर्मविरोधी आशय असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार घालणे, हे हिंदू जागृत होत असल्याचे लक्षण ! |