धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार ! – शिवसेना आणि भाजप या पक्षांतील आमदारांचे आश्वासन
मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ नगर जिल्ह्यातही आदिवासी महिलांच्या धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री ‘चंगाई (उपचार) सभे’त गंभीर आजार बरे करण्याचा दावा उघडपणे करतांना दिसून आला. धर्मांतराचा प्रयत्न होत असलेल्या या घटना केवळ हिमनगाचे टोक असून राज्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने धर्मांतराच्या घटना घडत आहेत. या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने २९ नोव्हेंबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र शासनाला ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करण्याची शिफारस केली होती. या शिफारसीनुसार शासनाने तात्काळ कार्यवाही करावी आणि राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेना आणि भाजप या पक्षांचे आमदार अन् मंत्री यांना भेटून करण्यात आली. या वेळी शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या आमदारांनी धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार, असे आश्वासन दिले आहे.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी शिवसेनेचे आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, सुहास कांदे, गजानन बाबर, श्रीनिवास वनगा, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, तसेच भाजपचे आमदार सर्वश्री नीतेश राणे, सुरेश धस, अतुल भातखळकर, राम सातपुते, सुभाष देशमुख, सुनील कांबळे, राजेश पाडवी, भीमराव तापकीर, देवराव होळी यांना धर्मांतर बंदी कायदा करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी अनेक आमदारांनी ‘हा विषय आम्ही विधीमंडळात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित करू, तसेच स्वत:च्या स्वत:चे पत्र देऊन शासनाला कायदा करण्यासाठी सांगू’, असे आश्वासन दिले.