जावळी (सातारा) येथे स्मशानभूमीच्या अभावी पावसात मृतदेहावर अग्नीसंस्कार न करता तो पुरला !
सातारा, २६ ऑगस्ट (वार्ता.) – जावळी तालुक्यातील सालोशी गावात वर्षानुवर्षे स्मशानभूमी नाही. त्यामुळे ग्रामस्थांना एका हिंदु व्यक्तीच्या अंतयात्रेनंतर पावसातच हिंदु धर्मशास्त्रानुसार मृतदेहाला अग्नी न देता पुरण्याची वेळ आली. यामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असणार्या जावळी आणि महाबळेश्वर तालुक्याच्या सीमेवर कोयना विभागातील सालोशी हे गाव आहे. या वेळी आपल्या भावना व्यक्त करतांना ग्रामस्थ म्हणाले, ‘‘सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे, हे आमचे दुर्भाग्य आहे. अनेकवेळा तोंडी आणि लेखी निवेदन देऊनही याकडे कुणीही लक्ष देत नाही. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आम्हाला अजूनही पारतंत्र्याची वागणूक मिळत आहे. आता कोणत्याही राजकारण्यांच्या नादी न लागता लोकवर्गणीतून गावात स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’ (ग्रामस्थांना असा निर्णय घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतामध्ये अशी स्थिती जनतेवर ओढावणे संतापजनक आहे. धर्मशास्त्रानुसार मृत व्यक्तीला पुढील गती मिळण्यासाठी मृतदेहावर अग्नीसंस्कार होणे आवश्यक आहे. असंवेदनशील प्रशासनामुळे असे करता न येणे, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून उपाय काढावा, हीच जनतेची मागणी ! |