अणूयुद्धाची शक्यता आणि त्याचे परिणाम !
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपलेले नाही. त्यामुळे जगात अणूयुद्धाचा धोका सातत्याने वाढत आहे. एका अभ्यासगटाने जगाला भयावह चेतावणी दिली आहे. ‘आज रशिया अणि युक्रेन यांच्यात पूर्ण प्रमाणात अणूयुद्ध झाले, तर जगातील ५० लाख लोकांचा मृत्यू होईल. तथापि हे सर्व लोक बाँबच्या थेट परिणामामुळे नाही, तर जगभरातील उपासमारीच्या प्रभावाने मारले जातील’, असा दावा नवीन अभ्यासात करण्यात आला आहे.
१. ‘अणूयुद्ध झाले, तर जगातील कोट्यवधी लोक मारले जातील’, अशी शक्यता वर्तवण्यात येणे
‘नुकतेच एक वृत्त प्रकाशित झाले. त्यानुसार अमेरिकेच्या एका ‘जर्नल’मध्ये संशोधन करण्यात आले आहे. त्यात ‘अमेरिका आणि रशिया यांच्यात अणूयुद्ध झाले, तर जगातील कोट्यवधी लोक मारले जातील’, असे म्हटले आहे. सध्या युक्रेनचे युद्ध चालूच आहे आणि ते थांबण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ‘हे युद्ध जिंकायचे असेल, तर आम्ही अणूबाँब किंवा हायड्रोजन बाँब यांचा वापरही करू शकतो’, अशी धमकी रशियाने अनेक वेळा दिली आहे. तसेच अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक खटके उडत असतात. आताच तैवानच्या सूत्रावरून अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला होता. तेथेही अणूयुद्धाची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेतील ‘रटगर्स विद्यापिठा’तील शास्त्रज्ञांनी जगभरातील ६ संभाव्य आण्विक संघर्षांचे परिणाम दर्शवले आहेत. त्यांचा अभ्यास ‘नेचर फूड’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात त्यांनी वरील अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज आण्विक स्फोटामुळे वातावरणात काजळी सोडण्याच्या आधारावर काढण्यात आला आहे.
२. अणूबाँबमुळे सर्व बेचिराख होऊन प्रचंड विध्वंस होणे
थोडक्यात पाहिले, तर अणूयुद्धाचा परिणाम महाभयंकर असतो. अणूबाँब टाकण्यात आला, तर त्याचे किलोटनप्रमाणे मोजमाप केले जाते. एका साधारण अणूबाँबला ४० किलोटनाचा म्हटले जाते. तो अमेरिकेने दुसर्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर टाकला होता. अणूबाँबमुळे केवळ बाँबचाच स्फोट होत नाही, तर इतरही प्रचंड हानी होते. जेथे अणूबाँब टाकला जातो, तेथील वातावरण एकदम उष्ण होऊन सूर्याहून अधिक तापमान निर्माण होते. त्यामुळे तेथील सर्व गोष्टी जळून खाक होतात. तसेच तेथे पेट्रोल पंप, गॅस स्टेशन, ‘इलेक्ट्रिक ग्रिड’ असल्याने परत दुसर्या आगी लागू शकतात. त्यातही मोठ्या प्रमाणात हानी होते. ‘ग्राऊंड झिरो’पाशी, म्हणजे जेथे अणूबाँब टाकला असतो, तेथे बाहेरच्या बाजूने प्रचंड वेगाने हवा फेकली जाते. त्यात येणार्या इमारती, वाहने आदी पालापाचोळ्यासारखी उडून जातात. जेथे अणूबाँब टाकला जातो, तेथे म्हणजे ‘ग्राऊंड झिरो’च्या ठिकाणी एक पोकळी निर्माण होते आणि २ मिनिटांनी त्या भागाकडे परत सगळीकडची हवा अतिशय वेगाने येऊ लागते. या वादळामध्ये येणार्या सर्वांचा विध्वंस होतो. अशा प्रकारे दोन वेळा असे वादळ निर्माण होते.
३. अणूस्फोटातून होणार्या किरणोत्सर्गामुळे मानवजातीची होणारी अपरिमित हानी
तिसरी हानी किरणोत्सर्गामुळे होते. प्रथम ज्या ठिकाणी अणूबाँब टाकला जातो, तेथे पुष्कळ किरण निर्माण होतात. एखाद्याला सहस्र पटींने ‘एक्स-रे’चा डोस दिला, तर त्याचे शरीर कसे भाजून निघेल, त्याप्रमाणे परिणाम होतात. त्यामुळे त्या भागातील सर्व सजीव प्राणी मारले जातात किंवा घायाळ होतात. त्यानंतर अनेक वर्षे त्या भागातील भूमी, हवा, पाणी आणि पिके किरणोत्सर्गामुळे बाधित होतात. तेथील लोकांना अनेक वर्षे या किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. ही हानी त्या भागातील मानवजातीला सहन करावी लागते. एवढेच नाही, तर हे परिणाम पुढील भागात सरकत जातात. जेव्हा हा बाँबस्फोट होतो, तेव्हा धुराचा प्रचंड लोट हवेत उठतो. बाँबस्फोट शक्तीशाली असेल, तर त्याचे ढग एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरतात की, त्यामुळे भूमीवर सूर्यप्रकाशही पडत नाही. सूर्यप्रकाशाविना मानवजात जिवंत राहू शकत नाही. युक्रेन, रशिया किंवा अमेरिका यांच्या भागात मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात आणि तेथून जगाला अन्नधान्य पुरवले जाते. अशा ठिकाणी बाँबस्फोट झाले, तर पिकांची प्रचंड हानी होते. त्यामुळे जगाला मोठ्या प्रमाणात दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.
४. अणूबाँबचा स्फोट होण्याची शक्यता वाटल्यास अन्य देशांनी त्या देशावर दबाव निर्माण करणे
असे म्हणतात की, भारतापेक्षा पाकिस्तानकडे अधिक प्रमाणात अण्वस्त्रे आहेत. काही कारणाने त्यांनी बाँब टाकले, तर ते मोठ्या प्रमाणात भारताची हानी करू शकतात. तरीही पुष्कळ घाबरून जाण्याचे कारण नाही; कारण भारताकडे त्यालाही प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. त्याला ‘सेकंड स्ट्राईक कॅपेबेलिटी’ असे म्हटले जाते. इतिहासात वर्ष १९४४ मध्ये प्रथमच दुसर्या महायुद्धात अणूबाँबचा शस्त्र म्हणून वापर करण्यात आला होता. त्यानंतर तशी आगळीक परत कधीही करण्यात आली नाही. पाकिस्तान भारताला वेळोवेळी धमक्या देत असतो की, ते भारताच्या विरोधात अणूबाँबचा वापर करू शकतात. ज्या देशांकडे अणूबाँब आहेत, त्या राष्ट्रांवर उपग्रहाच्या माध्यमातून नेहमीच जगाचे लक्ष असते. त्यामुळे त्यांनी कुठलीही उलटसुलट कारवाई करण्याचे प्रयत्न केले, तर लगेचच सर्व जग जागृत होऊन त्या देशावर दबाव निर्माण करतात. एवढे मात्र निश्चित की, अणूयुद्धाचा धोका आहे. एखादा वेडसर आतंकवादी किंवा जहाल शासनकर्ता यांच्यामुळे हा धोका निर्माण होऊ शकतो.
५. अणूयुद्धाच्या संकटापासून होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक !
अणूयुद्धाच्या संकटातून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याविषयी वेळोवेळी प्रशिक्षण द्यायला पाहिजे. एक राष्ट्र म्हणून भारतीय सैन्य त्याला निश्चितच प्रत्युत्तर देईल; परंतु न्यूनतम हानी कशी करायची ? याचे प्रशिक्षण सामान्य माणसांना मिळणे आवश्यक आहे. याविषयी मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. पुण्यात ‘न्यूक्लियर बायोलॉजिकल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग’मध्येही ही माहिती मिळेल. अशा प्रकारचे आक्रमण झाले, तर स्वत:चे संरक्षण कसे करायचे ? याचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे