परात्पर गुरु डॉ. आठवले अंतरात आहेत आणि दिवाळी पाडव्याला त्यांनी दर्शन देऊन साधकांना मौल्यवान केले, असे जाणवणे
सर्व साधकांना मोक्षाचा मार्ग दाखवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अंतरातच आहेत, अंतरातील त्यांचे तत्त्व जागृत करण्याचे प्रयत्न करून त्यांना अनुभवायचे आहे’, याची जाणीव होणे : ‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग कधी लाभणार ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. त्यानंतर ‘देव मला जे आवश्यक आहे, ते देतच आहे. कधी साधकांच्या माध्यमातून, कधी प्रसंगातून, तर कधी सेवेतून देव मला घडवतच आहे. परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून माझ्या समवेतच असतात. मग ‘त्यांना स्थुलातून वेगळे भेटायला हवे’, असे का वाटते ? परात्पर गुरु डॉक्टरांना मी बाहेर का शोधते ? ते तर माझ्यातच आहे. मला केवळ माझ्यातील त्यांचे तत्त्व जागृत करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठीचे माझे प्रयत्न मला वाढवायचे आहेत’, याची मला जाणीव झाली.
२. ‘आर्ततेने मारलेली हाक देवापर्यंत पोचतेच’, याची अनुभूती येणे आणि वायुदेवाला प्रार्थना केल्यावर त्याने साहाय्य केल्याची प्रचीती येणे : मी परात्पर गुरु डॉक्टरांना मनापासून आणि आर्ततेने आळवल्यावर माझी हाक त्यांच्यापर्यंत पोचत असल्याची अनुभूतीही ते मला देतात. मी काही वेळा वायुदेवाला सांगते, ‘तू माझी हाक गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कानापर्यंत लवकर पोचव’ आणि ‘माझी हाक त्यांच्यापर्यंत पोचते’, याची प्रचीतीही मला येते.
३. एकदा दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्याने ‘त्यांनीच साधकांना मौल्यवान केले’, असे जाणवणे : ‘एकदा कार्तिक शुक्ल प्रतिपदेला (दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी) परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजताच माझ्या मनात विचार आले, ‘हा दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. या दिवशी पृथ्वीवर विष्णुतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. अशा दिवशी माझी स्थुलातून साक्षात् श्रीविष्णूची भेट होणार आहे. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. परात्पर गुरु डॉक्टरांनी दर्शन देऊन आम्हालाच मौल्यवान केले आहे, भाग्यवान बनवले आहे.’
– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|