१९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन !
पावसाळी अधिवेशनाची सांगता !
मुंबई, २६ ऑगस्ट (वार्ता.) – राज्य विधीमंडळाच्या अवघ्या ६ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे २५ ऑगस्ट या दिवशी सूप वाजले. (अधिवेशनाची सांगता झाली.) पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबरपासून चालू होणार आहे, असे विधानसभा येथे अध्यक्ष आणि विधान परिषद येथे सभापती यांनी घोषित केले.
अधिवेशनाच्या कामकाजात विधानसभेत एकूण ५७ घंटे २५ मिनिटांचे कामकाज झाले. विरोधकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने एकही बैठक वाया गेली नाही. कनिष्ठ सभागृहातील सदस्यांनी प्रतिदिन सरासरी ९ घंटे २५ मिनिटे राज्यातील प्रश्नांवर आणि त्या अनुषंगाने येणार्या विषयांवर चर्चा केली. तब्बल ४ सहस्र ८१५ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. पैकी २५१ प्रश्न स्वीकारले गेले, तर २२ प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. सभागृहात ८६२ लक्षवेधी मांडल्या गेल्या. यातील ९४ लक्षवेधी स्वीकारण्यात आल्या असून ३७ लक्षवेधींना उत्तर देण्यात आली. १० शासकीय विधेयके आणि ४ शासकीय ठराव मांडून संमत करण्यात आले. विधानसभेत अधिकाअधिक ८७.१२ टक्के, तर न्यूनतम ७०.७ टक्के सदस्यांची उपस्थिती होती.
विधान परिषदेत इतर कारणांमुळे ५० घंट्यांचे कामकाज झाले नाही !विधान परिषदेत ६ दिवसांच्या कालावधीत ६ बैठका झाल्या. प्रत्यक्षात ४२.३० घंट्यांचे कामकाज झाले. मंत्री अनुपस्थित असल्याने ३० मिनिटांचे, तर इतर कारणांमुळे तब्बल ५० घंट्यांचे कामकाज होऊ शकले नाही. सभागृहात प्रतिदिन सरासरी ७ घंटे ५ मिनिटांचे कामकाज झाले. १ सहस्र ३८२ तारांकित प्रश्न विचारण्यात आले. त्यांपैकी ३६० प्रश्न स्वीकारले, तर २९ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. सभागृहात २९३ लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. त्यांपैकी १०७ मान्य करण्यात आल्या, तर २२ लक्षवेधींवर सभागृहात प्रत्यक्ष चर्चा झाली. ६३ औचित्याची सूत्रे उपस्थित करण्यात आली. अल्पकालीन चर्चेसाठी ६ सूचना मांडण्यात आल्या. ४ शासकीय ठराव संमत केले; मात्र या वेळी विधेयके संमत करण्यात आली नाहीत. |