सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे विकाराची तीव्रता अल्प होणे !
१. ओटीपोटातील विकारावर २ वर्षे औषधोपचार करूनही त्याची तीव्रता अल्प न होणे : ‘मला नोव्हेंबर २०१९ मध्ये ओटीपोटात डाव्या बाजूला एक मोठी गाठ झाली. त्या गाठीचे ‘फायब्रोमेटॉसिस’ असे निदान झाले. गाठीचा आकार मोठा असल्याने आणि तिच्यामध्ये डाव्या बाजूची मुख्य रक्तवाहिनी गुंतली गेली असल्याने तिची शस्त्रक्रिया करता येत नव्हती. त्यासाठी मुंबई येथील एका मोठ्या रुग्णालयात उपचार करतांना त्यांनी ‘केमोथेरपी’ची औषधे पोटातून देण्यास प्रारंभ केला; परंतु त्या औषधांचा मला त्रास होऊ लागला, तसेच माझ्यावर दुष्परिणामही दिसू लागले. त्यामुळे काही काळ ती औषधे थांबवावी लागली. त्या कालावधीत त्या गाठीचा आकार मोठा झाला. त्यानंतर आयुर्वेदाची औषधे २ वर्षे घेतल्यानंतर त्या गाठीचा आकार थोडा न्यून (कमी) झाला; परंतु विकाराची तीव्रता अल्प होत नव्हती.
२. सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांनी विकारावर दिलेला नामजप केल्यामुळे दीड मासात (महिन्यात) विकाराची तीव्रताही न्यून होणे : मार्च २०२२ मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्याशी भेट झाली. त्यांनी या विकारावर मला एक नामजप सांगून तो प्रतिदिन १ घंटा करण्यास सांगितला. नामजपाला प्रारंभ करून दीड मास (महिना) झाल्यावर ‘टाटा हॉस्पिटल’मध्ये तपासणी केली असता त्या गाठीचे विभाजन झाल्याचे दिसले. डॉक्टर म्हणाले, ‘‘हे पुष्कळ चांगले लक्षण आहे. सहसा असे कुणाच्या संदर्भात घडत नाही. तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात. या विकाराची तीव्रता न्यून होत आहे. ‘ही गाठ निष्क्रीय होत आहे’, असा याचा अर्थ आहे.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या कृपेनेच हे सर्व घडत आहे. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्रियांका सुजय बर्गे, पलूस, जिल्हा सांगली. (६.७.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |