नम्र, प्रेमळ, निर्लोभी, निगर्वी आणि साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांचा त्रास दूर करण्यासाठी तत्पर असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
उद्या, २८.८.२०२२ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
परांजपे कुटुंबियांची पूर्वपुण्याई !परांजपे कुटुंबियांचे (मूळ सांगली येथील आणि आता फोंडा, गोवा येथे रहात असलेले सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचे) भाग्य थोर आहे. केवढी ही पूर्वपुण्याई ! महर्षींच्या सांगण्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या सुकन्या आहेत. त्यांना सद्गुरु मुकुल गाडगीळ यांच्यासारखे संत जावई म्हणून लाभले आहेत. – सौ. वसुधा दवंडे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. (२०.८.२०२१) |
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा उद्या, २८.८.२०२२ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी ५९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी ५९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा शिरसाष्टांग नमस्कार !
१. साधकांची पावलोपावली काळजी घेणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
संतजन आपले मायबाप आहेत. ते कृपावंत आहेत. ‘आपल्याला सांभाळणारे, पावलोपावली आपली काळजी घेणारे’, असे हे संतजन आहेत. सद्गुरु मुकुल गाडगीळ हेही असेच आहेत.
२. ‘साधकांचा त्रास दूर व्हावा’, अशी तळमळ असणे
सद्गुरु गाडगीळकाका वाईट शक्तीचा त्रास असलेल्या साधकांना त्रासाचे निवारण होण्यासाठी नामजप, मुद्रा आणि न्यासस्थान शोधून देतात. ही सेवा ते न कंटाळता अव्याहतपणे करतात. मलाही कधी कधी अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास होतो. तेव्हा ते स्वतः सद्गुरु असूनही माझ्यासारख्या सामान्य साधकाला प्रेमाने नामजपादी उपाय सांगतात. त्यांना ‘साधकांचा त्रास दूर व्हावा’, याची तळमळ असते.
३. सद्गुरु काका एखादे ‘तपस्वी ऋषि’ असल्याप्रमाणे वाटणे
परात्पर गुरुदेवांनी हे अनमोल रत्न साधकांसाठी दिले आहे. सद्गुरु गाडगीळकाकांचा शांत आणि हसरा चेहरा पाहून मला ते ‘तपस्वी ऋषि’ असल्याप्रमाणे वाटतात. एकदा मी त्यांना तसे भ्रमणभाषवर बोलतांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘पुष्कळ साधकांना तसे वाटते !’’ त्यांनी मला हे सांगितले, तेही निगर्वीपणाने ! सद्गुरु गाडगीळकाका यज्ञात आहुती देण्यासाठी बसतात. तेव्हा ते एखादे ऋषि आणि योगी यांच्याप्रमाणेच भासतात.
४. सुनेशी कसे वागावे ?याविषयी दिलेला आदर्श दृष्टीकोन
एकदा सद्गुरु काकांनी मला सांगितले, ‘‘सुनेला आपल्या मुलीच्या ठिकाणी पहावे, म्हणजे तिने काही बोलले, तरी आपल्याला वाईट वाटत नाही.’’ तेव्हा त्यांनी मला ‘सासू आणि सून यांच्यातील सुसंवादाचा जणू कानमंत्रच सांगितला’, असे वाटले.
५. उच्च विद्याविभूषित असूनही कसलाच गर्व नसणे
सद्गुरु गाडगीळकाका उच्च विद्याविभूषित असूनही त्यांना कसलाच गर्व नाही. ते परात्पर गुरूंच्या आज्ञेचे पालन करत आहेत. त्यांचे रहाणीमान अतिशय साधे आहे. ते वागण्या-बोलण्यातून कधीही स्वतःची विद्वत्ता दर्शवत नाहीत.
६. तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वानूं ।। १ ।।
अवतार तुम्हां धराया कारण । उद्धराया जन जड जीव ।। २ ।।
वाढवया सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ।। ३ ।।
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसें तुम्ही जगीं संतजन ।। ४ ।।
– संत तुकाराम महाराज
अर्थ : संत तुकाराम महाराज सर्व संतजनांना उद्देशून म्हणतात, ‘‘तुम्ही संत म्हणजे कृपा करणारे मायबाप आहात. मी तुमची कीर्ती गाण्यास असमर्थ आहे. तुम्ही दीन जनांचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण केला आहे. जगात सुख, भक्तीभाव, धर्म, कुळाचार आणि विठ्ठल नामाचा महिमा प्रसृत करण्यासाठी तुम्ही आला आहात. चंदन जसे इतरांसाठी झिजत रहाते आणि सर्वांना सुगंध देते; त्याचप्रमाणे तुम्ही संतजन या जगाच्या कल्याणासाठी आहात.
संत तुकाराम महाराज यांनी वरील अभंगात वर्णिल्याप्रमाणेच सद्गुरु गाडगीळकाका अत्यंत नम्र, प्रेमळ, निर्लोभी आणि निगर्वी आहेत.
‘देवाने त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावे’, अशी मी प्रार्थना करते. परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. वसुधा दवंडे (वय ६६ वर्षे), इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. (२०.८.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |