जीवामृत कसे बनवावे ?
सनातनची घरोघरी लागवड मोहीम
‘एका प्लास्टिकच्या तांब्यामध्ये ३०० मि.लि. (अनुमाने १ पेला) पाणी, देशी गायीचे ३० ग्रॅम (अनुमाने अर्धी वाटी) ताजे शेण, देशी गायीचे ३० मि.लि. (अनुमाने अर्धी वाटी) मूत्र (हे कितीही जुने चालते), १ चमचा बेसन, १ चमचा गूळ आणि चिमूटभर माती यांचे मिश्रण बनवून सुती कपड्याने झाकून ठेवावे. हे मिश्रण ३ दिवस सकाळ-सायंकाळ काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अर्धा मिनिट ढवळावे. चौथ्या दिवशी यामध्ये १० पट (३ तांबे) पाणी मिसळावे. हे पाण्यात पातळ केलेले जीवामृत कुंडीतील झाडांना प्रत्येकी १ – १ वाटी या प्रमाणात मुळांशी द्यावे. हे पाणी मिसळलेले जीवामृत फडक्याने गाळून तुषाराच्या बाटलीत (स्प्रेमध्ये) भरून याची झाडांवर फवारणीही करावी. प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना फवारणी करावी. एकदा बनवलेले जीवामृत २ – ३ दिवसांत वापरून संपवावे.
देशी गायीच्या केवळ ३० ग्रॅम शेणापासून ३ दिवसांत ३० कुंड्यांना पुरेल एवढे नैसर्गिक खत बनते. याहून स्वस्त आणि पटकन बनणारे दुसरे कोणते खत असेल ? १५ दिवसांतून एकदा असे खत बनवा आणि घरच्या घरी भरपूर भाजीपाला पिकवा.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)
________________________________________
जीवामृताविषयी सविस्तर माहितीसाठी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
मार्गिका – https://www.sanatan.org/mr/a/83659.html
______________________________