शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती !
यापुढील निवडणुका एकत्र लढवणार !
मुंबई – शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली असून यापुढील निवडणुका संभाजी ब्रिगेडसमवेत एकत्रित लढवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केली. या वेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे हे उपस्थित होते.
१. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘काहीजण ‘शिवरायांचा महाराष्ट्र आहे’, असे म्हणतात; परंतु तसे वागत नाहीत. आमचे हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेड आमच्यासमवेत आली आहे. दुहीच्या शापाला गाडून टाकू. संभाजी ब्रिगेडसमवेत मतभिन्नतेपेक्षा मतऐक्य किती आहे, हे महत्त्वाचे आहे. मतभिन्नता कुठे आहे, यावर विचार करून समन्वयाने काम करू. राज्यघटना टिकवण्यासाठी ही युती झाली आहे.’’
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद – LIVE https://t.co/fGpSNwYtyW
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 26, 2022
२. या वेळी गंगाधर बनबरे म्हणाले, ‘‘संभाजी ब्रिगेड लोकहित आणि महाराष्ट्राचे हित यांसाठी काम करत आहे. सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. छोटे पक्ष, संघटना आणि विचारधारा अस्तित्वात ठेवायची असेल, तर एकत्र येणे आवश्यक आहे. लवकरच एक महामेळावा घेतला जाईल.
३. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, ‘‘लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आहे. देशात विषमतावादी वातावरण झाले आहे. त्यासाठी क्रांतीची आवश्यता आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही विधानसभा, लोकसभासह सर्व निवडणुका लढवणार आहोत.’’
४. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी केल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाच्या विरोधी भूमिका घेणार्या संभाजी ब्रिगेडशी युती केल्याने हिंदुत्वनिष्ठांना आश्चर्य वाटले आहे.