सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या शौर्याचा जागर
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन
सिंधुदुर्ग – क्रांतीकारकांच्या असीम त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांनी केलेला त्याग आणि शौर्य यांचे सर्वांना स्मरण व्हावे अन् सर्वांना राष्ट्र-धर्माचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत कणकवली, वैभववाडी, कुडाळ तालुक्यातील कसाल, वाडीवरवडे, गोवेरी; सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, मडुरे अशा विविध ठिकाणी ही व्याख्याने घेण्यात आली. याप्रसंगी विविध फलकांच्या माध्यमातून क्रांतीकारकांचा शौर्यशाली इतिहास समाजासमोर सांगितला गेला. याचा लाभ एकूण ५५० जणांनी घेतला. स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात येणार्या प्रशिक्षणार्थींच्या पुढाकाराने या व्याख्यानांचे नियोजन करण्यात आले होते.
क्षणचित्रे
१. कार्यस्थळी लावलेले क्रांतीकारकांच्या कार्याची माहिती देणारे फलक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
२. व्याख्यानानंतर काही ठिकाणी जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
३. या वेळी मांडण्यात आलेल्या विषयातून प्रेरणा मिळाल्याचे अनेकांनी सांगितले.