बेती, वेरे येथील ‘ॲथर’ शो-रूमच्या प्रवेशद्वारावरील श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र प्रबोधनानंतर हटवले
हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश !
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
पणजी, २५ ऑगस्ट (वार्ता.) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेती, वेरे येथील ‘ॲथर’ या इलेक्ट्रिक दुचाकी शो-रूमच्या प्रवेशद्वारावर दुचाकी चालवणार्या श्री गणेश देवतेचे चित्र प्रदर्शनीय भागात लावण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने याविषयी शो-रूमच्या व्यवस्थापनाचे प्रबोधन केल्यानंतर व्यवस्थापनाने श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र त्वरित हटवले. (यासाठी ‘ॲथर’ शो-रूमच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन ! – संपादक)
प्रारंभी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने २५ ऑगस्ट या दिवशी बेती, वेरे येथील ‘ॲथर’ शो-रूमचे व्यवस्थापक राहुल कांबळी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र हटवण्याविषयी एका निवेदनाद्वारे मागणी केली. हिंदु जनजागृती समितीने निवेदनात म्हटले होते की, स्वत:च्या व्यावसायिक लाभासाठी चित्राच्या माध्यमातून श्री गणेशाचे मानवीकरण करून तिचा अवमान करण्यात आला असून यामुळे गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. शो-रूमचे व्यवस्थापक राहुल कांबळी म्हणाले, ‘‘कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, तरी संबंधित मालकाशी चित्र काढण्याविषयी बोलून घेतो.’’ या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री महेश प्रभु, सुशांत दळवी आणि सौ. सुषमा हेदे यांचा समावेश होता. यानंतर सायंकाळी शोरूमच्या व्यवस्थापनाने संबंधित विडंबनात्मक चित्र हटवले.