पोलीस भरती घोटाळ्यातील ६ रॅकेट उद्ध्वस्त !
पिंपरी – पोलीस भरती घोटाळ्यातील ६ रॅकेट उद्ध्वस्त करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संभाजीनगर, जालना आणि बीड येथून ५ जणांना कह्यात घेतले आहे. त्यामुळे पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींची संख्या ५६ इतकी झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात ७२० जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली; मात्र या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर निगडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचे अन्वेषण गुन्हे शाखेचे युनिट ४ करत आहे. या गुन्ह्यात ७५ हून अधिक जण आरोपी असून उरलेल्यांचा शोध पोलीस घेत आहेत. संभाजीनगर, बीड आणि जालना येथून कह्यात घेतलेल्या ५ जणांकडून पोलिसांनी ७६ भ्रमणभाष संच, ६६ इलेक्ट्रॉनिक स्पाय यंत्र, १२ वॉकी टॉकी संच आणि चार्जर, रोख ११ लाख रुपये, सिम कार्ड्स, कागदपत्रे, ही उपकरणे लपवून परीक्षेला येण्यासाठी वापरलेले कपडे आदी पोलिसांनी शासनाधीन केले आहे.
संपादकीय भूमिकाअशा पद्धतीने भरती झालेल्या पोलिसांकडून नैतिकता आणि नीतिमत्तेची काय अपेक्षा करणार ? |