बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे !
हिंदुत्वासाठी कार्य करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार !
मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – मी कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका माझ्यावर करण्यात आली. होय, मी ‘कंत्राटी’ मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे आणि राज्याला समृद्ध करण्याचे कंत्राट मी घेतले आहे. सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचे कंत्राट मी घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे कंत्राटही मी घेतले आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना केले.
या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘आम्हाला गद्दार म्हणून हिणवण्यात येत आहे; परंतु आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेबांनी ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचे शत्रू आहेत. त्यांना जवळ घेण्यापेक्षा मी शिवसेना बंद करीन’, असे म्हटले होते. राज्यात आम्ही युती म्हणून निवडून आलो होतो. जनतेने बहुमताने निवडून दिले, त्यांची सत्ता जनतेला अपेक्षित होती; परंतु राज्यात अनैसर्गिक आघाडी झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी कुणी अप्रामाणिकपणा केला ? आम्ही हिंदुत्व सोडले असते, तर जनतेने आमचे स्वागत केले नसते. आमची भूमिका जनतेला मान्य आहे. आम्ही ‘गद्दार’ नाही, ‘खुद्दार’ आहोत.’’
देवस्थाने, गडदुर्ग यांची हानी होऊ नये, यासाठी शासन प्रयत्नशील !शासन पंढरपूरचा उत्तम विकास आराखडा सिद्ध करत आहे. यासह राज्यातील देवस्थाने आणि गड-दुर्ग यांची हानी होऊ नये, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. |
महाराष्ट्राचा पुढील १२ वर्षांचा विकास आराखडा आम्ही सिद्ध करत आहोत !महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. उत्तम विरोधक बनून सहकार्य करावे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ही राज्याची २ चाके आहेत. राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. जनतेचा विकास हाच आमचा ‘अजेंडा’ आहे. हातात हात घालून पुढे जाऊया. महाराष्ट्राचा पुढील १२ वर्षांचा विकास आराखडा आम्ही सिद्ध करत आहोत. |
…. तर मोदी यांच्याकडे जाणे चुकीचे काय ?
नीती आयोगाच्या बैठकीसाठी देहली येथे गेलो असतांना मला शेवटच्या रांगेत उभे करण्यात आले, याची तुलना औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवरायांना मागच्या रांगेत उभे करण्याशी करण्यात आली. राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळी मात्र मला पहिल्या रांगेत उभे केले होते; परंतु रांग महत्त्वाची नाही, तर काम महत्त्वाचे आहे. त्या वेळी मोगलांचे राज्य होते. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी ३७० कलम हटवले. श्रीराम मंदिर बांधले. ते देशभक्तीचे कार्य करत असतील, तर त्यांच्याकडे जाण्यात चुकीचे काय आहे ? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी दिलेली अन्य महत्त्वाची माहिती
१. गुन्हेगारीमध्ये राज्याचा ११ वा क्रमांक आहे. गुन्हा न नोंदवणे हे सरकारला परवडणारे नाही.
२. ज्या मुली बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी शासनाकडून राबवण्यात येणार्या ‘मुस्कान’ योजनेच्या अंतर्गत वर्ष २०२१-२२ मध्ये ३७ सहस्र ५११ मुलींचा शोध लागला आहे.
३. राज्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनातील ७५ सहस्र रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
४. राज्यात एकूण २ लाख ४३ सहस्र पोलीस आहेत. त्यांतील ८२ सहस्र पोलिसांना निवासस्थानाची आवश्यकता आहे. पोलिसांसाठी बीबीडी चाळीत १५ लाख रुपयांमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
५. पुढील अडीच वर्षांनंतर मुंबईतील एकही रस्ता डांबराचा दिसणार नाही. सर्व रस्त्यांचे ‘काँक्रिटीकरण’ करण्यात येणार आहे.